खार्ग बेटावर हल्ला झाला तर गंभीर परिणाम!

16 Mar 2026 11:37:54
तेहरान,
Iran warns America अमेरिका आणि इराण यांच्यात वाढत चाललेल्या तणावामुळे पश्चिम आशियातील परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. या पार्श्वभूमीवर इराणच्या क्रांतिकारी रक्षक दलाच्या नौदल प्रमुखांनी अमेरिकेला थेट इशारा दिल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली आहे. विशेषतः होर्मुझ सामुद्रधुनी आणि खार्ग बेट परिसरातील घडामोडींमुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्याबाबत चिंता वाढली आहे.इराणी नौदल प्रमुखांनी इशारा देताना म्हटले की, यापूर्वी होर्मुझ सामुद्रधुनीत इराणची क्षमता तपासण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र जर तेलाच्या किमती ठरवण्यासाठी या सामुद्रधुनीच्या नियंत्रणाचा वापर केला गेला, तर खार्ग बेटावर कोणताही हल्ला झाल्यास ऊर्जा पुरवठा आणि किमतींच्या समीकरणात मोठा आणि गंभीर बदल घडू शकतो. त्यांच्या या वक्तव्यामुळे परिस्थिती आणखी तणावपूर्ण बनली आहे.
 
 

Iran warns America 
 
दरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझ सामुद्रधुनी कोणत्याही परिस्थितीत जहाज वाहतुकीसाठी खुली ठेवली जाईल, असा निर्धार व्यक्त केला आहे. त्यांनी चीन, फ्रान्स, ब्रिटन, जपान आणि दक्षिण कोरिया यांसारख्या देशांना युद्धनौका पाठवून या महत्त्वाच्या सागरी मार्गाच्या सुरक्षेसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. होर्मुझ सामुद्रधुनी हा इराण, ओमान आणि संयुक्त अरब अमिराती यांच्या दरम्यान असलेला अतिशय अरुंद पण अत्यंत महत्त्वाचा समुद्री मार्ग आहे. जगातील सुमारे वीस टक्के तेल निर्यात याच मार्गातून होत असल्याने या भागाचे धोरणात्मक महत्त्व खूप मोठे मानले जाते. इराणचे सर्वात मोठे तेल केंद्र असलेले खार्ग बेटही या परिसराच्या जवळच आहे.
 
याचदरम्यान इराणचे परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला अराघची यांनी स्पष्ट केले की होर्मुझ सामुद्रधुनी आंतरराष्ट्रीय जहाज वाहतुकीसाठी खुली आहे, मात्र अमेरिका आणि इस्रायलच्या जहाजांना या मार्गातून जाण्याची परवानगी दिली जाणार नाही. पश्चिम आशियात अलीकडे वाढलेल्या लष्करी हालचालींच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे विधान केले आहे. एका अमेरिकन वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की सागरी मार्ग पूर्णपणे बंद केलेला नाही. तथापि, पर्शियन आखात आणि ओमानच्या आखाताला जोडणाऱ्या या महत्त्वाच्या समुद्री मार्गात अनेक देशांची जहाजे अडकली असल्याचे सांगितले जात आहे. त्यामध्ये भारतातील काही जहाजांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या भागातील तणावाचा परिणाम जागतिक व्यापार आणि ऊर्जा पुरवठ्यावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Powered By Sangraha 9.0