कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचा चौदावा दीक्षांत समारंभ बुधवारी

16 Mar 2026 22:21:11
नागपूर, 
kavikulaguru-kalidas-sanskrit-university : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक येथे चौदावा दीक्षांत समारंभ बुधवार, दिनांक १८ मार्च रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे. समारंभाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अतुल वैद्य राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून भारतातील प्रख्यात अभियांत्रिकी शास्त्रज्ञ, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबईचे माजी कुलगुरू आणि पद्मश्री प्रा. गणपती यादव उपस्थित राहणार आहेत.
 

k
 
 
 
या दीक्षांत समारंभात २०२४–२५ या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना एकूण १४ हजार ५६४ पदवी प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येणार आहेत. यामध्ये २७२२ पदव्युत्तर पदवी, ९४९३ पदवी, १८०९ पदविका, ९० पदव्युत्तर पदविका आणि ८७ प्रमाणपत्रांचा समावेश आहे. तसेच मुक्त व दूरस्थ शिक्षण केंद्रामार्फत देण्यात येणाऱ्या १७१ पदव्युत्तर पदवी, १२१ पदविका आणि ५६ प्रमाणपत्रांचाही समावेश आहे. समारंभात ५४ सुवर्णपदके व १३ रोख पारितोषिके प्रदान केली जाणार असून १४ विद्यार्थ्यांना पीएच.डी. पदवीने गौरविण्यात येणार आहे.
 
यावर्षी बहुभाषाविद् व कवयित्री आशा भालचंद्र पांडे यांना मराठी, संस्कृत, हिंदी आणि उर्दू भाषांमधील साहित्यिक योगदानाबद्दल मानद ‘डी.लिट्.’ (विद्यावाचस्पती) उपाधी प्रदान करण्यात येणार आहे.
 
एम.ए. आचार्य (संस्कृत) विषयात सर्वाधिक गुण मिळवून सर्व विद्याशाखांमधून प्रथम आलेल्या धनश्री सुभाष लोणकर हिला ११ सुवर्णपदके आणि एक रोख पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहे. त्याचबरोबर राज्यपाल व कुलपतींकडून दिले जाणारे कुलपती सुवर्णपदकही तिला मिळणार आहे.
 
रामटेक, वारंगा आणि रत्नागिरी परिसरातून सर्वोत्कृष्ट अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या अनुज रवी मंचावार यांना ‘श्री समर्थ सद्गुरू शंकर महाराज रसाळ स्मृती सुवर्णपदक’ प्रदान करण्यात येईल. तसेच विविध संकायांतील उत्कृष्ट संशोधन प्रबंधांसाठी पाच विद्यार्थ्यांना सुवर्णपदक देण्यात येणार आहे.
 
विद्यापीठातील विविध पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या समारंभात पदके व पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेत कुलगुरू डॉ. अतुल वैद्य यांनी ही माहिती दिली.
Powered By Sangraha 9.0