चंद्रपूर,
manasvi-girheishwarchiddhi : चंद्रपूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदी उबाठाच्या नगरसेवक मनस्वी गिर्हे यांची ईश्वरचिढ्ढीने निवड करण्यात आली. सोमवार, 16 मार्च रोजी मनपा राणी हिराई सभागृहात झालेल्या विशेष बैठकीत पार पडलेल्या निवडणूक प्रक्रियेनंतर जिल्हाधिकारी तथा पीठासीन अधिकारी विनय गौडा यांनी हा निकाल जाहीर केला.
चंद्रपूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदासाठी 13 मार्च रोजी एकूण 3 अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यामध्ये उबाठाकडून मनस्वी गिर्हे यांचे 2 अर्ज, तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे वसंत राजेश्वर देशमुख यांचा 1 अर्ज भरला गेला होता.
सोमवारी, दुपारी 1 वाजता विशेष बैठकीची कारवाई सुरू करण्यात आली. त्यावेळी नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात आली. वैध उमेदवारांना नामनिर्देशन पत्र मागे घेण्यासाठी 15 मिनिटांचा कालावधी देण्यात आला. या कालावधीत कुणीही अर्ज मागे न घेतल्याने हात उंचावून मतदानाची प्रक्रिया पार पडली.
मतदानामध्ये मनस्वी गिर्हे यांना 8, तर वसंत देशमुख यांनाही 8 अशी समसमान मते प्राप्त झाली. त्यामुळे नियमानुसार, ईश्वर चिट्ठीद्वारे निवड प्रक्रिया पार पाडण्यात आली. या प्रक्रियेत मनस्वी गिर्हे यांच्या नावाची चिट्ठी निघाल्याने जिल्हाधिकारी तथा पीठासीन अधिकारी विनय गौडा यांनी त्यांना चंद्रपूर महानगरपालिका स्थायी समितीचे सभापती म्हणून घोषित केले.