छत्रपती संभाजीनगर,
retired professor murder शहरातून एक धक्कादायक हत्याकांड उघडकीस आले आहे. ५० लाख रुपयांच्या आर्थिक वादातून एका सोशल मीडिया रील स्टारने निवृत्त प्राध्यापकाची गोळ्या झाडून हत्या केली आणि त्यांचा मृतदेह जंगलात पुरल्याची घटना समोर आली आहे. तब्बल ४० दिवसांनंतर पोलिसांनी आरोपींच्या कबुलीजबाबाच्या आधारे जंगलातून मृतदेह बाहेर काढला.
या प्रकरणातील मृतक राजाभाऊ सुभ्राव लोंढे हे निवृत्त प्राध्यापक असून मुख्य आरोपी सोशल मीडिया स्टार विशाल राठोड असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. या गुन्ह्यात त्याला मदत करणारे आकाश पवार आणि करण आडे यांनाही पोलिसांनी अटक केली आहे.
पैशांच्या वादातून रचला हत्येचा कट
पोलिसांच्या माहितीनुसार, ५० लाख रुपयांच्या व्यवहारावरून हा वाद निर्माण झाला होता. तपासात असेही समोर आले आहे की आरोपी विशाल राठोडने जवळपास दीड महिन्यापूर्वीच हत्येचा कट रचला होता. या कटाचा भाग म्हणून त्याने गेवराई तांडा परिसरातील जंगलात आधीच सुमारे आठ फूट खोल दोन खड्डे खोदून ठेवले होते.
पार्टीच्या बहाण्याने केली हत्या
५ फेब्रुवारी रोजी विशाल राठोडने प्राध्यापक राजाभाऊ लोंढे यांना एका पार्टीसाठी बोलावले. पार्टी संपल्यानंतर त्याने लोंढे यांच्या बंदुकीवर ताबा मिळवून त्यांच्यावर गोळी झाडली. त्यानंतर आरोपींनी मृतदेह कारच्या डिकीत ठेवला आणि जवळपास आठ तास शहरात फिरत राहिले.
जंगलात पुरला मृतदेह
६ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास आरोपी गेवराई तांडा जंगलात पोहोचले आणि आधीच खोदलेल्या खड्ड्यात मृतदेह पुरला. नंतर खड्डा पूर्णपणे भरून टाकण्यासाठी जेसीबी चालकाला बोलावून धमकी देत काम करून घेतल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
तपास भरकटवण्यासाठी मोबाईलवर स्टेटस
गुन्ह्यानंतर संशय टाळण्यासाठी आरोपी विशाल राठोड पुण्याला गेला आणि मृतक लोंढे यांच्या मोबाईलवरून इंग्रजीत एक स्टेटस पोस्ट केले. त्या स्टेटसमध्ये “मी वैयक्तिक कामात व्यस्त आहे, त्रास देऊ नका,” असा संदेश लिहून लोकांना ते सुरक्षित असल्याचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
कुटुंबाच्या तक्रारीनंतर तपासाला वेग
१० मार्च रोजी लोंढे यांच्या कुटुंबीयांनी पोलिस आयुक्तांकडे बेपत्ता झाल्याची तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी तपासाला वेग दिला. १४ मार्च रोजी तपासात विशाल राठोड आणि त्याच्या साथीदारांचा सहभाग उघड झाला. १५ मार्च रोजी चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आणि पोलिसांनी जंगलातून मृतदेह बाहेर काढला.
हनी ट्रॅप अँगलचीही चौकशी
या प्रकरणात हनी ट्रॅपचा अँगल असल्याचाही संशय पोलिस तपासत आहेत. प्राथमिक माहितीनुसार, ६० वर्षीय प्राध्यापक लोंढे आणि २४ वर्षीय विशाल राठोड यांची ओळख एका महिलेच्या माध्यमातून झाली होती.retired professor murder ५० लाखांच्या व्यवहारात त्या महिलेची भूमिका होती का, याचाही तपास सुरू आहे.
सोशल मीडियावर ‘लाला’ म्हणून प्रसिद्ध
विशाल राठोड सोशल मीडियावर “लाला” या नावाने ओळखला जात होता. इंस्टाग्रामवर त्याचे सुमारे १.७५ लाख फॉलोअर्स असल्याची माहिती आहे. २०१९ पासून तो रील व्हिडिओ बनवत होता आणि महागड्या कार, स्मार्टफोन व आलिशान जीवनशैली दाखवणारे अनेक व्हिडिओ त्याच्या प्रोफाइलवर पोस्ट केलेले आहेत. २०२५ मध्ये त्याने जॅग्वार कार खरेदी केल्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केला होता.
दरम्यान, या खळबळजनक हत्याकांडामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी चर्चा सुरू असून पोलिस पुढील तपास करत आहेत.