वाढत्या तापमानाचा संत्रा बागांना फटका

16 Mar 2026 22:08:52
कुर्‍हा, 
rising-temperatures-hit-orange-groves : तापमानाचा पारा चाळीसपर्यंत पोहचल्यामुळे संत्रा उत्पादक शेतकर्‍यांना मोठा फटका बसला आहे. उन्हामुळे फळांना चट्टे पडत असून, फळगळती वाढली आहे. झाडावरच संत्रा फळे पिवळी होताना दिसत आहे. तसेच सर्व तज्ञांच्या सल्ल्यानुसार संत्रा झाडाला १७० लिटर पाणी व कॅनोपी देऊन सुद्धा संत्रा फळे झाडावर पिवळी होत आहे. सर्वात मोठी फळगळ यावर्षी मार्च महिन्यात पहायला मिळत आहे. त्यामुळे कुर्‍हा मंडळातील शेतकरी हवालदिल झाला आहे.
 
 
k
 
संत्रा फळगळतीचा थेट परिणाम संत्रा उत्पादनावर होत आहे. सर्व उपयोजना करून सुद्धा झाडांची क्षमता फारशी दिसत नाही. मार्च महिन्याच्या मध्यात तापमानाचा पारा ४० अंशांपर्यंत पोहचला आहे. चार दिवसांत तापमानाने उसळी घेतली आहे. अजून एप्रिल, मे, जून महिना बाकी आहे. दुसरीकडे अलनिनोच्या प्रभावाने पावसाळा लांबण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि खरीप हंगाम पेरणी काळ जुलै महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. बदलत्या हवामानाचा संत्रा फळबागांना फटका बसला आहे. विदर्भात संत्रा फळांचे मोठे क्षेत्र आहे. वाढत्या उन्हामुळे संत्रा फळांची गळ होणे, फळे भाजणे आणि फळांच्या गुणवत्तेवर प्रतिकूल परिणाम होणे अशा समस्या आहेत. उष्णतेमुळे फळे गळून पडत आहेत. तज्ञांच्या माहितीनुसार किमान ३२ अंश सेल्सिअसपर्यंत तापमानात लहान फळे तग धरतात. मात्र, ३५ अंशाच्या पुढे तापमान गेल्यामुळे फळगळती वाढली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे जैवविविधता नष्ट करणे, झाडांची कत्तल, सिमेंट रस्त्यांचे जास्त प्रमाणात बांधकाम, अत्यंत जहाल कीटकनाशके आणि तणनाशके यांचा भरपूर वापर करणे आणि रासायनिक खतांचा अती बेसुमार वापर करणे होय.
 
 
संत्रा उत्पादक शेतकरी निखिल तेटू म्हणाले की, तज्ञांच्या सल्ल्यानुसारकाही प्रमाणात गवताचे नैसर्गिक आच्छादन केले आहे. सकाळी किंवा सायंकाळी संत्रा बागेला पाणी देणे सुरू आहे. अंदाजानुसार प्रत्येक झाडाला १७० लिटर पाणी दिले जात आहे. तसेच जमिनीत सिलिकॉनसारखे अन्नद्रव्य व्यवस्थापन सुरू असून इतर सूक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थापन करणे सुरू आहे. पानांची संख्या भरपूर आहे. झाडांना कॅनोपी देऊन सुद्धा संत्रा फळगळ अजूनही सुरूच आहे.
Powered By Sangraha 9.0