थकबाकीदार ग्राहकांकडे लागणार स्मार्ट मीटर

16 Mar 2026 22:07:40
अमरावती,
smart-meters : महावितरणने वीज बिल वसुली मोहिमेला गती दिली असून थकबाकीदार वीज ग्राहकांवर कठोर कारवाई सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत थकबाकीदार ग्राहकांचे थेट वीज मीटर काढण्यात येत आहे. कारवाईनंतर खंडित करण्यात आलेला वीज पुरवठा पुनर्जोडणी शुल्कासह १०० टक्के थकबाकी भरल्यानंतरच सुरू करण्यात येणार आहे. तसेच थकबाकीसाठी काढण्यात आलेल्या मीटरच्या ठिकाणी प्राधान्याने स्मार्ट मीटर बसविण्याचे निर्देश मुख्य अभियंता अशोक साळुंके यांनी दिले आहेत.
 
 
l
 
 
 
आर्थिक वर्ष संपण्यास केवळ १५ दिवस शिल्लक असताना अमरावती परिमंडळातील घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर वर्गवारीतील सुमारे ३ लाख वीज ग्राहकांकडे सुमारे ६०० कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे महावितरणने वीज बिल वसुलीसाठी आक्रमक भूमिका घेतली असून, थकबाकी न भरल्यास थेट वीज मीटर काढून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. थकबाकीमुळे मीटर काढल्यानंतर काही ग्राहकांकडून शेजार्‍यांकडून अनधिकृत वीज पुरवठा घेण्याचे प्रकार आढळत असल्याने महावितरणने याबाबत कठोर इशारा दिला आहे. अशा प्रकारे वीज घेणे किंवा देणे हे विद्युत कायदा २००३ अंतर्गत गुन्हा असून संबंधित ग्राहकांसह अनधिकृतपणे वीज देणार्‍या शेजार्‍यांवरही गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
 
 
अनधिकृत वीज वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी महावितरणच्या भरारी पथकांकडून आता रात्रीच्या गस्तीमध्ये वाढ करण्यात येणार आहे. या दरम्यान अनधिकृत वीज वापर आढळल्यास तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात येईल. वीज चोरी हा फौजदारी गुन्हा असून या गुन्ह्यासाठी तीन वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते, असे महावितरणने स्पष्ट केले आहे. वीजबिल वसुली मोहिमेत ग्राहकांनी थकबाकी भरून सहकार्य करावे, तसेच भरारी पथकांच्या कारवाईदरम्यान शासकीय कामात अडथळा आणू नये. अन्यथा शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश मुख्य अभियंता अशोक साळुंके यांनी क्षेत्रीय कार्यालयांना दिले आहेत.
Powered By Sangraha 9.0