इराण-इस्रायल युद्धाचा काश्मीर पर्यटनावर फटका

16 Mar 2026 13:34:00
जम्मू,
War hits Kashmir tourism इराण आणि इस्रायल दरम्यान सुरु असलेला युद्ध संघर्ष, त्यात अमेरिकेच्या सहभागामुळे जागतिक ऊर्जा बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. या हजारो किलोमीटर दूर सुरु असलेल्या युद्धाचे परिणाम काश्मीर खोऱ्यातही जाणवू लागले आहेत.काश्मीरच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार मानल्या जाणाऱ्या पर्यटन उद्योगाला या युद्धामुळे मोठा फटका बसला आहे. दल लेक परिसरातील प्रसिद्ध हाऊसबोट्स सध्या ओस पडलेल्या अवस्थेत आहेत. मागील वर्षी याच काळात पर्यटकांची गर्दी एवढी होती की हाऊसबोट्स ओव्हर-बुक झाल्या होत्या, परंतु यंदा इंधन दरवाढीमुळे हवाई तिकिटे महाग झाल्याने पर्यटकांचा काश्मीरला कल कमी झाला आहे.
 
War hits Kashmir tourism
 
पर्यटन हंगामाच्या सुरुवातीसच अशा परिस्थितीमुळे हॉटेल आणि रेस्टॉरंट मालक चिंता व्यक्त करत आहेत. श्रीनगरमधील हॉटेल व्यावसायिकांचे म्हणणे आहे की, काही प्रमाणात गॅसचा साठा असला तरी पर्यटक नसल्यास व्यवसाय चालवणे कठीण होणार आहे. स्वयंपाक गॅसच्या तुटवड्यामुळे अनेक ठिकाणी सेवा मर्यादित ठेवावी लागत आहे. इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्चही वाढला आहे. पेट्रोल, डिझेल आणि विमान इंधनाच्या किमती वाढल्याने जम्मू-काश्मीर सरकारने प्रवासी भाड्यात सुमारे १८ टक्के वाढ केली आहे. परंतु पर्यटकांची संख्या कमी असल्यामुळे टॅक्सी चालक आणि ट्रॅव्हल ऑपरेटर यांना अपेक्षित फायदा होत नाही.
 
 
 
बुकिंगमध्ये मोठी घट
काश्मीरमध्ये मार्चपासून पर्यटन हंगामाची सुरुवात होते आणि वसंत ऋतूमुळे पर्यटकांची मोठी गर्दी दिसून येते. मात्र, यंदा परिस्थिती उलट आहे. काश्मीर दूर अँड ट्रॅव्हल ऑपरेटर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, मागील वर्षाच्या तुलनेत यंदा आतापर्यंत केवळ सुमारे १५ टक्केच बुकिंग झाली आहेत. हवाई तिकिटांचे वाढलेले दर आणि गॅसच्या तुटवड्यामुळे अनेक पर्यटक आपले आरक्षण रद्द करत आहेत, ज्यामुळे पर्यटन क्षेत्रावर गंभीर परिणाम होत आहे.
Powered By Sangraha 9.0