संगमनेर
Acid attack अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात एक अत्यंत संतापजनक घटना घडली असून, सहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर ॲसिड हल्ला करण्यात आला आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील शाळेत शिकणारी ही विद्यार्थिनी शाळा सुटल्यानंतर घरी जात असताना अज्ञात तरुणाने तिच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे मुलगी गंभीर जखमी झाली.
Acid attack घटनेनंतर मुलीच्या आरडाओरडीनंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेतली. जखमी मुलीला तात्काळ उपचारासाठी लोणी येथे हलविण्यात आले आहे. तिच्यावर उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.
Acid attack दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. ॲसिड हल्ला करणारा आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वीच संगमनेर तालुक्यातील रणखांब येथे लग्नाला नकार दिल्याने एका मुलीवर प्राणघातक हल्ल्याची घटना घडली होती. त्यानंतर पुन्हा घडलेल्या या प्रकारामुळे कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.