अमरावती,
national-youth-festival : सत्यभामा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अॅन्ड टेक्नॉलॉजी, जेपीआर नगर एसएच चेन्नई, तामिळनाडू येथे १० ते १४ मार्च दरम्यान झालेल्या ३९ व्या अखिल भारतीय राष्ट्रीय युवा महोत्सवात अमरावती विद्यापीठाच्या चमूंनी एकूण १३ पारितोषिके प्राप्त केली.
रांगोळी, हिंदी वक्तृत्व स्पर्धा, मिमिक्री, वेस्टर्न व्होकल सोलो या कलाप्रकारात प्रथम पारितोषिक, भारतीय समूहगान, शास्त्रीय नृत्य, वेस्टर्न इन्स्ट्रुमेंटल सोलो या कलाप्रकारात व्दितीय व माईम, कल्चरल प्रोसेशन या कलाप्रकारात तृतीय तसेच लोकनृत्य, फोक ऑर्केस्ट्रा, गृप साँग वेस्टर्न या कलाप्रकारात चवथे आणि क्ले मॉडेलिंग या कलाप्रकारात पाचवे, अशी १३ पारितोषिके प्राप्त केली आहे. अखिल भारतीय आंतर विद्यापीठ मध्य विभाग स्पर्धेत चॅम्पीयनशिप प्राप्त केल्यानंतर विद्यापीठाच्या विद्यार्थी कलावंत, साथीदार यांनी राष्ट्रीय युवा महोत्सव स्पर्धेत अमरावती विद्यापीठाचा राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक केला आहे.
विद्यार्थी विकास विभागांतर्गत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. त्यामधून अनेक प्रावीण्यप्राप्त विद्यार्थी कलाक्षेत्रात उत्तुंग भरारी घेऊन अमरावती विद्यापीठाचा नावलौकिक करीत आहे. ही अत्यंत अभिमानास्पद बाब असून सर्व विद्यार्थी कलावंत, साथीदार व चमू व्यवस्थापक यांच्या परिश्रमाने ३९ व्या अखिल भारतीय राष्ट्रीय युवा महोत्सव स्पर्धेत अमरावती विद्यापीठाला घवघवीत यश मिळाले आहे. चमू व्यवस्थापक म्हणून डॉ. शीतलबाबू तायडे व डॉ. जयश्री कुळकर्णी यांनी, साथीदार म्हणून डॉ. निखिलेश नलोडे, प्रशांत ठाकरे, अमोल अढाऊ, प्रकाश मेश्राम, अभिजित भावे, अवधुत पाटील यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. या घवघवीत यशाबद्दल कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरु डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, विद्यार्थी विकास संचालक डॉ. राजीव बोरकर यांनी संपूर्ण चमूचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.