तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
bribery-case : लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत तलाठ्यास सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. हा निकाल जिल्हा न्यायाधीश व विशेष न्यायाधीश बघेले यांनी मंगळवार, 17 मार्च रोजी दिला. संजय शेषराव नक्षणे (चांदोरेनगर, धामणगाव रोड, यवतमाळ) असे लाचखोर तलाठ्याचे नाव आहे. संजय नक्षणे याने तक्रारदार संदीप रामदास गुल्हाने यांना त्यांच्या शेताचे फेरफार व 7/12 बनविण्याकरिता लाचेची मागणी केली होती. या प्रकरणी बाभुळगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.
या प्रकरणी सरकारच्या वतीने चार साक्षीदार तपासण्यात आले. साक्षपुराव्यानंतर तपास अधिकारी व पंच यांच्या साक्षीनंतर न्यायाधिशांनी संजय नक्षणे यास कलम 7 लाचलुचपत प्रतिबंधक कायदा 1988 अन्वये 5 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व 1 लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
तसेच दंड न भरल्यास 1 वर्ष सश्रम कारावास, कलम 13 (2) लाचलुचपत प्रतिबंधक कायदा 1988 अन्वये 7 वर्षे सश्रम कारावास व 2 लाख रुपये दंड, दंड न भरल्यास 1 वर्ष 6 महिने सश्रम कारावास अशी शिक्षा ठोठावली. या प्रकरणी सरकारी पक्षाच्या वतीने सहायक सरकारी वकील नरेंद्र पांडे यांनी काम पाहिले. तसेच पैरवी अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे गोवर्धन वाढई यांनी सहकार्य केले.