मुंबई,
cyber-fraud-in-gas-booking : गॅस सिलेंडरच्या वाढत्या मागणीचा फायदा घेत सायबर गुन्हेगार आता गॅस बुकिंगच्या नावाखाली लोकांची फसवणूक करत आहेत. फोन कॉल, बनावट वेबसाइट, सोशल मीडियावरील संदेश किंवा व्हॉट्सअॅप लिंकद्वारे “सबसिडी अपडेट करा” किंवा “बुकिंग कन्फर्म करा” असे सांगून नागरिकांना जाळ्यात ओढले जाते.
हे फसवे लोक स्वतःला गॅस एजन्सीचे कर्मचारी असल्याचे भासवतात आणि घाईघाईत माहिती मागतात. त्यानंतर लिंक पाठवून किंवा अॅप डाउनलोड करायला लावून बँक आणि वैयक्तिक तपशील घेतले जातात. एकदा ही माहिती मिळाल्यावर काही मिनिटांतच खात्यातून हजारो ते लाखो रुपये काढले जातात.
विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि डिजिटल व्यवहारांची कमी माहिती असलेले लोक या फसवणुकीचे बळी ठरत आहेत. तज्ज्ञांच्या मते, “सबसिडी बंद होईल” किंवा “कनेक्शन कट होईल” अशा भीतीदायक कारणांनी लोकांना लगेच निर्णय घ्यायला भाग पाडले जाते.
सायबर पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करत सांगितले आहे की, गॅस बुकिंगसाठी नेहमी अधिकृत अॅप किंवा वेबसाइटच वापरावी. कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये आणि ओटीपी, एटीएम तपशील किंवा पासवर्ड कोणालाही देऊ नये.