तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
cylinder-booking-rules : गॅस सिलिंडर बुकिंग नियमांमुळे यवतमाळ जिल्ह्यात शालेय पोषण आहार योजनेत अडथळेनिर्माण झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हितासाठी तातडीने यावर उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी राज्य प्राथमिक शिक्षक समितीने केली आहे.
सिलिंडर बुकिंग संदर्भातील नवीन नियमांमुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांमध्ये शालेय पोषण आहार (माध्यान्ह भोजन) शिजविण्यात गंभीर अडचणी निर्माण झाल्या आहेत. ग्रामीण भागात 45 दिवसांच्या अंतराने सिलिंडर बुकिंगची अट असल्यामुळे अनेक शाळांमध्ये उपलब्ध असलेला एकमेव सिलिंडर 25 ते30 दिवसांतच संपत आहे. परिणामी, अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना नियमित पोषण आहार देणे कठीण झाले असून ही परिस्थिती विद्यार्थ्यांच्या आरोग्य व शिक्षणाच्या दृष्टीने अत्यंत गंभीर आहे.
जिल्ह्यातील अनेक दुर्गम व आदिवासी भागांमध्ये आधीच शाळा विविध अडचणींना सामोèया जात आहेत. त्यातच पुरवठा खंडित होणे किंवा बुकिंग करता न येणे, यामुळे काही शाळांमध्ये आहार शिजविणे थांबण्याच्या मार्गावर आहे. काही ठिकाणी शिक्षकांना स्वतःच्या खर्चाने शहरातून सिलिंडर आणण्याची वेळ येत असून ही अत्यंत गंभीर बाब आहे.
गेल्या काही वर्षांपासून शाळांमध्ये एलपीजी सुविधा उपलब्ध झाल्यानंतर पारंपरिक सरपणाचा वापर बंद झाला आहे. सध्या सरपणासाठी कोणतेही अनुदान उपलब्ध नसल्यामुळे पर्यायी व्यवस्था करणे अशक्य झाले आहे. विद्यार्थ्यांचे हित सर्वोच्च मानून समितीच्या पुढील तातडीच्या मागण्या आहेत.
शाळांसाठी सिलिंडर बुकिंग नियमांमध्ये सवलत द्यावी. शालेय पोषण आहार योजनेसाठी स्वतंत्र व अखंडित पुरवठा व्यवस्था सुरू करावी. प्रत्येक शाळेला किमान दोन सिलिंडर उपलब्ध करून द्यावे, पर्यायी इंधनासाठी विशेष निधी, अनुदान मंजूर करावे.
या संदर्भात तातडीने सकारात्मक निर्णय घेण्यात आला नाही, तर विद्यार्थ्यांच्या हितासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती यांच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नानासाहेब नाकाडे, जिल्हाध्यक्ष पुंडलिक रेकलवार, महेश सोनेकर, संदीप मोहाडे व प्रफुल पुडकर यांनी दिला आहे.