ड्रग्सविरोधात कडक कारवाई; ‘झिरो टॉलरन्स’चा इशारा

17 Mar 2026 14:53:22
मुंबई,
devendra-fadnavis : राज्यात अमली पदार्थांच्या वाढत्या समस्येला आळा घालण्यासाठी सरकारने आता कडक भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट केले की, ड्रग्सविरोधात ‘झिरो टॉलरन्स’ धोरण राबवले जाणार असून अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल.
 
 
devendra-fadnavis
 
 
नागपूरमधील मोतीबाग परिसरात अलीकडेच ड्रग्स तस्करांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली. पोलिसांनी छापे टाकून गांजा आणि शस्त्रसाठा जप्त केला. या प्रकरणात संबंधित आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्याविरोधात चार्जशीट दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील टप्प्यात त्यांच्या मालमत्ताही जप्त केल्या जाणार आहेत.
 
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर केवळ कारवाई करून थांबणार नाही, तर संपूर्ण गुन्हेगारी साखळी उघड करून ती मोडून काढण्यावर भर दिला जाणार आहे. बेकायदेशीर बांधकाम आढळल्यास नियमांनुसार नोटीस देऊन ती हटवली जाईल. तसेच संबंधित भागात विशेष मोहिमा राबवून ड्रग्सविरोधी कारवाई अधिक तीव्र केली जाणार आहे.
 
नागपूर पोलिसांनी ‘ऑपरेशन थंडर’ अंतर्गत गेल्या काही महिन्यांत मोठ्या प्रमाणावर कारवाया करत शेकडो गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. राज्यात ड्रग्सविरोधी लढा अधिक मजबूत करण्यासाठी अँटी नारकोटिक टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली असून ती सर्व जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहे.
 
याशिवाय, या प्रकरणांमध्ये सहभागी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवरही कडक कारवाई करण्यात येणार असून त्यांना थेट बडतर्फ केले जाईल. अल्पवयीन मुलांचा वापर ड्रग्स तस्करीत होत असल्याची बाब गंभीर मानून कायद्यात बदल करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला जाणार आहे. सरकारच्या या कठोर भूमिकेमुळे राज्यात ड्रग्सविरोधी कारवाई आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
Powered By Sangraha 9.0