जालना,
theft-of-gas-cylinders : तालुक्यातील रामनगर परिसरात गॅस एजन्सीच्या गोडाऊनमधून मोठी चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. आनंद भारत गॅस एजन्सीच्या उटवद शिवारातील गोडाऊनचे कुलूप तोडून चोरट्यांनी तब्बल ११० गॅस सिलिंडर चोरून नेले. या सिलिंडरची किंमत सुमारे साडेचार लाख रुपयांपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जात आहे.
रविवारी मध्यरात्री ही चोरी झाल्याचा अंदाज असून सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. चोरीमध्ये ९६ घरगुती सिलिंडर, १२ व्यावसायिक सिलिंडर आणि ५ किलोचे २ सिलिंडर असा एकूण मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे. या प्रकरणी एजन्सीचे व्यवस्थापक सिद्धार्थ आढाव यांनी मौजपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांकडून सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
दरम्यान, गॅस ग्राहकांसाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. ही प्रक्रिया मोबाईलवरून अधिकृत ॲपच्या माध्यमातून घरबसल्या पूर्ण करता येते. यामुळे गॅस सबसिडी सुरू राहते आणि भविष्यातील अडचणी टाळता येतात.