नवी दिल्ली,
forbes-list-released : फोर्ब्सच्या २०२६ च्या अब्जाधीशांच्या यादीनुसार भारतात एका वर्षात तब्बल २४ नवीन अब्जाधीशांची भर पडली असून देशातील एकूण अब्जाधीशांची संख्या आता २२९ वर पोहोचली आहे. यामुळे भारताची आर्थिक ताकद अधिक मजबूत होत असल्याचे चित्र दिसत आहे.
या यादीत उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांच्या संपत्तीत सर्वाधिक वाढ झाली आहे. त्यांच्या आर्सेलरमित्तल कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाल्याने त्यांची संपत्ती ३१ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली. गेल्या वर्षभरात त्यांनी मोठी कमाई करत दररोज कोट्यवधींची वाढ नोंदवली.
याशिवाय, फिजिक्सवाला या एडटेक प्लॅटफॉर्मचे संस्थापक अलख पांडे आणि प्रतीक माहेश्वरी यांचाही नव्या अब्जाधीशांमध्ये समावेश झाला आहे. कंपनीच्या आयपीओनंतर त्यांनी या यादीत स्थान मिळवले.
दरम्यान, ओ.पी. जिंदाल समूहाच्या सावित्री जिंदाल या भारतातील सर्वात श्रीमंत महिला ठरल्या असून त्या तिसऱ्या क्रमांकावर आहेत. कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक उदय कोटक यांनीही टॉप-१० मध्ये प्रवेश केला आहे.
विशेष म्हणजे, पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी तीन वर्षांनंतर पुन्हा या यादीत स्थान मिळवले आहे. फोर्ब्सची ही यादी कंपन्यांचे शेअर्स, बाजारातील माहिती आणि आर्थिक आकडेवारीच्या आधारे तयार केली जाते.