मुंबई,
chandrakant-patil : राज्यातील उच्च शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेत अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५०१२ सहाय्यक प्राध्यापक पदांची भरती करण्यास मंजुरी दिली आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत ही घोषणा केली. यामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली भरती प्रक्रिया आता मार्गी लागणार असून हजारो पात्र उमेदवारांना मोठा दिलासा मिळणार आहे.
राज्यातील सुमारे १२०० अनुदानित महाविद्यालये आणि विविध विद्यापीठांमध्ये मिळून ६१०० पेक्षा जास्त प्राध्यापक पदे भरण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहे. सध्या नवीन महाविद्यालयांना अनुदान देणे शक्य नसले तरी विद्यमान संस्थांमधील रिक्त जागा भरून शिक्षणाचा दर्जा सुधारण्यावर सरकारचा भर आहे.
सरकारच्या धोरणानुसार विद्यार्थ्यांना शुल्क सवलतीही दिल्या जात आहेत. अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांना पूर्ण शुल्कमाफी, ओबीसी विद्यार्थ्यांना अर्धी सवलत, तर मुलींना मोफत शिक्षणाची सुविधा दिली जात आहे. त्यामुळे शिक्षण सर्वांसाठी सुलभ करण्याचा प्रयत्न होत आहे.
याशिवाय, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) प्रभावीपणे राबवण्यासाठीही सरकार प्रयत्नशील असून प्राध्यापक भरतीमुळे शिक्षण व्यवस्थेला अधिक बळ मिळणार आहे. या निर्णयामुळे उच्च शिक्षण क्षेत्रातील रिक्त पदांचा प्रश्न कमी होऊन विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यास मदत होणार आहे.