समुद्रात क्रूशिवाय वाहत आहे रशियन टँकर; ड्रोन हल्ल्यानंतर मोठा धोका निर्माण

17 Mar 2026 13:16:03
नवी दिल्ली, 
russian-tanker-floating-without-crew इटली आणि माल्टा दरम्यानच्या भूमध्य समुद्रात एक रशियन तेलवाहू जहाज अनेक दिवसांपासून खलाशीविना भरकटत असून सागरी अधिकाऱ्यांनी याबाबत गंभीर इशारा दिला आहे. ‘आर्क्टिक मेटागाझ’ नावाचे हे जहाज सध्या पर्यावरणासाठी धोकादायक ठरत असून त्याला ‘वेळेचा स्फोटक’ असेही संबोधले जात आहे.

russian-tanker-floating-without-crew 
 
हवाई चित्रांमध्ये जहाजाच्या एका बाजूला काळपट झालेला भाग आणि मोठे भगदाड स्पष्ट दिसत आहे. जहाजाच्या आजूबाजूला पाण्यावर तेलाचा पातळ थर पसरलेला असल्याने प्रदूषणाची भीती अधिक वाढली आहे. russian-tanker-floating-without-crew अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या जहाजात सुमारे ९०० मेट्रिक टन डिझेल आणि ६० हजार मेट्रिक टनांहून अधिक द्रवित नैसर्गिक वायू साठवलेला आहे. हा साठा अजूनही जहाजात असल्याचे मानले जात असले, तरी कोणत्याही क्षणी गळती होऊन मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे जहाज रशियाच्या गुप्त तेलवाहतूक ताफ्याचा भाग असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आंतरराष्ट्रीय निर्बंधांना चुकवण्यासाठी अशा जुन्या जहाजांचा वापर केल्याचा आरोप रशियावर केला जात आहे.
सुमारे २७७ मीटर लांबीचे हे जहाज रशियातील मुरमान्स्क बंदरातून निघाले होते आणि इजिप्तकडे जात असताना ३ मार्च रोजी माल्टाच्या आग्नेयेस आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात त्यावर ड्रोनद्वारे हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. russian-tanker-floating-without-crew या हल्ल्यानंतर जहाजाला आग लागली आणि त्यावरील सुमारे ३० कर्मचाऱ्यांना जहाज सोडावे लागले. काही जण जखमी झाले होते. सर्वांना लाइफबोटींच्या सहाय्याने सुरक्षित बाहेर काढून लिबियातील बेनगाझी येथे पोहोचवण्यात आले. रशियाने या घटनेला दहशतवादी हल्ला ठरवत आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन असल्याचा आरोप केला आहे. तर रशियन परिवहन मंत्रालयाने या हल्ल्यामागे युक्रेनचा हात असल्याचे म्हटले आहे. मात्र युक्रेनकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
दरम्यान, जागतिक वन्यजीव निधीने इशारा देत सांगितले आहे की, जहाजातून इंधन किंवा वायूची गळती झाल्यास सागरी पर्यावरणाला मोठा फटका बसू शकतो. विषारी वायू, आग आणि सागरी जीवसृष्टीचे नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. हे जहाज ज्या भागात भरकटत आहे तो परिसर जैवविविधतेने समृद्ध असून अनेक दुर्मिळ सागरी प्रजातींचे निवासस्थान आहे. येथे प्रदूषण पसरल्यास स्थानिक मासेमारी आणि पर्यटन व्यवसायावरही गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.
Powered By Sangraha 9.0