मुंबई,
shilpa-shetty : अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्याशी संबंधित डीपफेक व्हिडिओ आणि फोटो प्रकरणात मुंबई हायकोर्टाने महत्त्वाचा निर्णय देत तिला मोठा दिलासा दिला आहे. काही महिन्यांपूर्वी तिचे बनावट (डीपफेक) व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. हे कंटेंट तिच्या परवानगीशिवाय तयार करण्यात आले होते, त्यामुळे तिची प्रतिमा मलिन होत असल्याचा दावा करत तिने न्यायालयात याचिका दाखल केली होती.
या प्रकरणावर सुनावणी करताना न्यायालयाने संबंधित वेबसाईट्स आणि व्यक्तींना हे सर्व आक्षेपार्ह व्हिडिओ, फोटो आणि लिंक ८ दिवसांच्या आत हटवण्याचे आदेश दिले आहेत. न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांनी स्पष्ट केले की, कोणत्याही व्यक्तीची, विशेषतः महिलेची प्रतिमा अशा प्रकारे सादर केली जाऊ नये ज्यामुळे तिच्या सन्मानाला धक्का पोहोचेल.
हे प्रकरण फक्त शिल्पा शेट्टीपुरते मर्यादित नसून, अनेक अभिनेत्रींचे डीपफेक व्हिडिओ सोशल मीडियावर पसरवले गेले आहेत. रश्मिका मंदाना, आलिया भट्ट आणि कतरिना कैफ यांच्याबाबतही असे प्रकार समोर आले होते.
या घटनांनंतर अनेक सेलिब्रिटींनी या प्रकाराचा निषेध केला आहे. अमिताभ बच्चन यांनीही दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. या प्रकरणामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या चुकीच्या वापराबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे.