उमरखेड मतदारसंघातील महत्त्वाच्या रस्त्यांसाठी आ. किसन वानखेडे यांची विधानभवनात जोरदार मागणी

17 Mar 2026 20:24:05
तभा वृत्तसेवा
उमरखेड,
kisan-wankhede : उमरखेड विधानसभा मतदारसंघातील महत्त्वाच्या रस्त्यांच्या कामांबाबत शासनाचे लक्ष वेधत आमदार किसन वानखेडे यांनी विधानभवनात लक्षवेधीद्वारे प्रश्न उपस्थित केला. राज्यमार्ग262 (पुसद उमरखेड हरदडा) ) तसेच 516 (विडूळ साखरा देवसरी) या सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांमध्ये आवश्यक बदल करण्याची त्यांनी ठाम मागणी केली. आ. वानखेडे यांनी सांगितले की, हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा असून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. पोफाळी येथे वसंत सहकारी साखर कारखाना असल्यामुळे तसेच उमरखेड शहरातील गोरोबा शाळा, साकळे विद्यालय, जिल्हा परिषद शासकीय मुलींची व मुलांची शाळा, महात्मा ज्योतिबा फुले शाळा, युनिव्हर्सल इंग्लिश मिडियम स्कूल, स्टुडंट वेलफेअर इंग्लिश मिडियम स्कूल, शासकीय निवासी मुलींची शाळा, कृषी महाविद्यालय, गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि प्रसिद्ध सहस्रकुंड धबधबा या पर्यटन स्थळामुळे या मार्गावर वाहतुकीचा मोठा ताण आहे.
 

y17March-Kisan 
 
 
 
तसेच हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग, प्रस्तावित शक्तिपीठ मार्ग आणि वर्धायवतमाळनांदेड या प्रस्तावित रेल्वे मार्गाशी जोडणारा महत्त्वाचा जड वाहतुकीचा मार्ग असल्याचेही त्यांनी नमूद केले. पुसद उमरखेड हरदडा मार्गावरील पोफाळी, कुपटी, मरसूळ, बेलखेड फाटा, उमरखेड चुरमुरा, टाकळी फाटा तसेच विडूळ साखरा देवसरी मार्गावरील विडूळ, चालगणी, साखरा, खरूस, कारखेड फाटा व देवसरी ही गावे या रस्त्यालगत आहेत. मात्र या कामाच्या अंदाजपत्रकात रस्त्याची रुंदी केवळ 7 मीटर प्रस्तावित करण्यात आली असल्याची बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली. वाढत्या वाहतुकीचा विचार करता ही रुंदी अपुरी ठरणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
 
 
यावेळी आमदार वानखेडे यांनी या दोन्ही रस्त्यांची रुंदी 7 ऐवजी 10 मीटर करण्यात यावी, तर गावांच्या हद्दीत 10 ऐवजी 12 मीटर करण्यात यावी अशी मागणी केली. तसेच गावांच्या हद्दीत रस्त्यांच्या दोन्ही बाजूंनी काँक्रिट नाली व काँक्रिट रस्त्याची तरतूद करण्यात यावी, अशीही त्यांनी मागणी केली.
 
 
यासोबतच उमरखेड शहराच्या पूर्वेकडील बाजूस राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलापासून गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालयझाडगाव (उमरखेड) पर्यंत रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात यावे. तसेच शहराच्या पश्चिम बाजूस छत्रपती शिवाजी महाराज चौक ते स्टुडंट वेलफेअर इंग्लिश मिडियम स्कूल, दहागाव (उमरखेड) पर्यंत रस्त्याचे चौपदरीकरण करून दोन्ही बाजूंनी काँक्रिट नाली बांधकाम करण्यात यावे, अशी ठोस मागणी त्यांनी शासनाकडे केली.
 
 
या सर्व बाबींचा विचार करून संबंधित विभागाला तत्काळ आवश्यक प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी आमदार किसन वानखेडे यांनी विधानभवनात केली.
Powered By Sangraha 9.0