वेध
विजय निचकवडे
bhandara teacher pocso case विकृती हा मानवी स्वभावाचा एक भाग मानला गेला तरी त्या विकृत वृत्तीला जोपासल्या गेलं तर ती अनेकांच्या दृष्टीने कशी घातक ठरू शकते. ही जाणीव सर्वांना असूनही जर अशा वृत्ती जोपासल्या जात असतील तर मात्र समाजभान गमावले गेले आहे, असेच म्हणावे लागेल. जी गोष्ट समाजातील प्रत्येकाला शरमेने मान खाली घालावी लागेल, इतकी किळसवाणी असेल आणि ती शासन-प्रशासनाच्या लेखी अंशतः चूक असेल तर मग मात्र विकृत प्रवृत्तींचे पीक येऊन विध्वंस करणार, हे नक्की. विकृती हा मानवी स्वभावाचा भाग म्हणून आपण त्याला सोडून दिले तर ती समाजाला पोखरत जाते, हे तेवढेच खरे. एखाद्या व्यक्तीच्या स्वभावात हा ‘विकृत’ योग असेल तर त्याच्यावर उपाययोजना करण्याची व्यवस्थाही आपल्या समाजात आहे. पण आम्ही तो त्याचा वैयक्तिक विषय म्हणून डोळेझाक करतो आणि बरेचदा तीच विकृती समाजात संवेदनशील विषय बनतात. मान्यच आहे, आम्ही कुणाच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करून वळण लावू शकत नाही; किमान जेव्हा संधी मिळेल, तेव्हा असलेल्या अधिकारांचा वापर करून अशा घातक वृत्तींना ठेचून नक्कीच काढू शकतो. हा विषय एवढ्यासाठीच आहे.
10 दिवसांपूर्वी जो काही प्रकार भंडारा जिल्ह्यात उघड झाला, तो प्रत्येकाला शरमेने मान खाली घालण्यास लावणारा होता. जो आमच्या आयुष्याला दिशा देतो, ज्याच्याकडून आम्हाला संस्कारांची अपेक्षा आहे. आई-वडिलानंतर जो आमचा एकमेव गुरू असतो, अशा शिक्षकाचा प्रताप विकृत्तीलाही लाजवेल असाच होता. ज्यांनी जग पाहिलं नाही, अशा चिमुकल्यांच्या शरीराशी खेळून आपली किळसवाणी भूक भागविणाऱ्या शिक्षकाचे बाहेर आलेले प्रताप शिक्षकी पेशालाही कलंकित करून गेले. हद्द म्हणजे, हे प्रकार पुढे आल्यानंतर ग्रामस्थांनी शिक्षकाला चोप दिला, तर तोच शिक्षक ‘झालं का तुमचं मारून’ म्हणून निर्विकारपणे बोलून जात असेल तर या धाडसामागे कोण? याचा विचार व्हायलाच हवा!
एक नव्हे, पाचदा या महाशयांनी प्रताप केले. मार खाल्ला. तुरुंगवास झाला. पण ते नोकरीत कायम आहेत. हे कसं? याचं कोड काही उलगडलेलं नाही. इतके गंभीर आरोप. दोषी असल्याचा अहवाल सर्वकाही विरोधात असताना प्रत्येक वेळी निलंबनानंतर नोकरीत पुन्हा समाविष्ट केला जाणारा हा शिक्षक इतका प्रभावी कसा असू शकतो? कदाचित पहिल्याच घटनेनंतर या वृत्तीला ठेचले असते तर आज निष्पाप पाच चिमुरड्यांच्या आयुष्याशी खेळण्याची हिंमत त्याची झाली नसती. सर्व काही विरोधात होते. पण तो न्यायालयातून निर्दोष सुटतो. त्यांचे वरिष्ठ अधिकारीही एवढ्या मोठ्या घटनांकडे अंशतः दोषी म्हणून पुन्हा त्याला नोकरीवर घेण्याचे आदेश काढतात आणि इथेच अशा वृत्तींना खतपाणी घातले जाते. 10 वर्षांपूर्वी चुकांची जाणीव ठोसपणे करून दिली गेली असती, तर आम्हाला आज विकृत मानसिकतेवर चर्चा करावी लागली नसती. हा यंत्रणेचा दोष की अजून काही? हा अभ्यासाचा विषय असू शकतो, पण ज्यांच्या हातात अधिकार आहेत, त्यांना त्याची जाणीव होऊ नये, याचे नवल वाटते. मुलींच्या आयुष्याशी खेळणे हा जर अंशतः दोष असेल तर पूर्णतः दोष कोणता, हे अशा अधिकाèयांनी स्पष्ट करायला नको का? हा अंशतः दोष हेच अशा वृत्तींची हिंमत वाढण्याचे मूळ कारण आहे. आमची यंत्रणा निद्रावस्थेत आहे. जोपर्यंत ही झापड डोळ्यावरून निघणार नाही, तोपर्यंत अशा विकृतांचे दोष हे अंशतःच असतील, हे नक्की!
एका शिक्षकाने केलेले हे कृत्य शिक्षकी पेशाला लाजविणारे आहे. त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून टाकणारे आहे. पण शिक्षकांच्या एकाही संघटनेला अशा शिक्षकाचा निषेध करावा किंवा त्यावर कठोर कारवाई व्हावी, यासाठी मागणी करावी वाटले नाही. आम्ही आमच्या पेशाचे म्हणून आणखी किती संवेदना मेल्यागत वागणारा आहोत. एरवी लहानसहान गोष्टींसाठी रस्त्यावर उतरणाèया या संघटना आज मात्र मूग गिळून बसल्या असतील तर विकृतीला त्यांनी दिलेला हा पाठिंबा तर नाही, असा प्रश्न पडतो. शिक्षकांच्या संघटना असोत किंवा प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या वागण्याची पद्धत याच गोष्टी अनिल राऊतसारख्या शिक्षकांचे मनोबल वाढवितात आणि त्यांच्यातील विकृतीची जोपासना करतात.bhandara teacher pocso case जोपासलेले हे विकृत मग कधीतरी समाजभान विसरून बेभान वागतात. या विकृत मानसिकतेला वेळीच ठेचले गेले नाही तर भविष्यात अनेक अनिल राऊत समाजापुढे आव्हान बनून उभे राहतील आणि मग यंत्रणाही हतबल होऊन सर्व तमाशा पाहत असतील. आज अनिल राऊतच्या निमित्ताने विकृत मानसिकतेला संपविण्यासाठी उदाहरण घालून देण्याची चांगली संधी आहे. दोष अंशतः की पूर्णतः याचे मूल्यमापन करीत बसण्यापेक्षा दोष समाजाला घातक हे हेरून कृती करण्याची ही वेळ आहे, असे वाटते!
9763713417
....