ब्रह्मवैवर्त पुराण
brahmavaivarta purana ‘ब्रह्मवैवर्त’ या नावातील ‘वैवर्त’ शब्द महत्त्वाचा आहे. वैवर्त शब्द विवर्तन शब्दसंबंधित आहे. विवर्तन म्हणजे चक्र किंवा चाकाचे फिरणे अर्थात परिवर्तन. सरळ आणि सोप्या भाषेत रूपांतरण, नित्यबदल, कायाकल्प किंवा अस्तित्व बदल होय. ब्रह्मवैवर्त म्हणजे ब्रह्माचे विवर्तन.
‘ब्रह्मवैवर्त म्हणजे ब्रह्मणो विवर्त: ।’
या पुराणात ब्रह्म राधाकृष्ण रूपात विवर्तित झाले. ब्रह्म कृष्णरूपाने प्रकट झाले, नव्हे श्रीकृष्ण म्हणजेच ब्रह्म. ‘
विवर्त ब्रह्मकात्स्नर्यं च कृष्णेन यत्र शौनक ।
ब्रह्मवैवर्तकं तेन प्रवदंति पुराविद: ।।’
कृष्णाचे आद्यविवर्त प्रकृती आहे. कृष्णाची आद्या प्रकृती श्रीराधा आहेत. सरळ भाषेत परब्रह्माचे विवर्त राधाकृष्ण आहे. म्हणून हे ब्रह्मवैवर्त पुराण होय. हे पुराण चार खंडात विभागले आहे. ब्रह्मखंड, प्रकृती खंड, गणपती खंड आणि श्रीकृष्णजन्म खंड असे ते चार खंड आहेत. यातील पहिल्या ब्रह्मखंडात बीजरूप असलेल्या परब्रह्म परमात्म्याचे म्हणजे श्रीकृष्ण तत्त्व निरुपण आहे. दुसèया प्रकृती खंडात प्रकृती स्वरूप परब्रह्म परमात्म्याची आद्याशक्ती श्रीराधा तत्त्वाचे आणि उपतत्त्व लक्ष्मी, दुर्गा, सरस्वती, सावित्री यांचे निरुपण आहे. तिसèया गणपती खंडात परमात्म स्वरूप भगवान गणपती तत्त्वाचे निरुपण आहे. चौथ्या श्रीकृष्णजन्म खंडात भगवान श्रीकृष्ण लीला तत्त्वाचे निरुपण आहे. थोडक्यात ब्रह्मवैवर्त पुराणात भगवान श्रीकृष्ण आणि त्यांची अभिन्नस्वरूपा श्रीराधारासेश्वरी यांचे ब्रह्मस्वरूप आणि लीला वर्णन आहे.
नैमिषारण्यात शौनकादी ऋषी बसले असताना तिथे पुराणप्रवक्ते सूत लोमहर्षन महोदय आणि त्यांचे पुत्र उग्रश्रवा यांचे आगमन झाले. त्यांचे पाद्यपूजन करून शौनकादी ऋषींनी सूतनंदन उग्रश्रवा ज्यांना सौती असेही म्हणतात; त्यांना अद्भुत, अपूर्व आणि अभिष्ट पुराण सांगण्याची विनंती केली. सर्वांच्या विनंतीला मान देऊन सौती यांनी परब्रह्म परमात्म्याचे परात्पर स्वरूप म्हणजे भगवान श्रीकृष्ण. त्यांचे विवर्तन ज्या पुराणात सांगितले सांगितले ते ब्रह्मवैवर्त पुराण होय.
ब्रह्मवैवर्त पुराण श्रीकृष्णाने ब्रह्मदेवांना, ब्रह्मदेवांनी धर्माला, धर्माने आपला पुत्र नारायणाला, नारायणाने नारदांना, महर्षी नारदांनी व्यासांना, महर्षी व्यासांनी सूतनंदन सौती यांना सांगितले होते. या पुराणात सर्वप्रथम ब्रह्मखंड असून यात गोलोकातील भगवान श्रीकृष्ण यांचे महिमान आहे. श्रीकृष्ण हेच एकमात्र सत्य असून सर्वोच्च ब्रह्म आहे. त्यांच्यापासूनच सृष्टीचा प्रारंभ झाला. गोलोकात भगवान श्रीकृष्णाच्या वामभागातून श्रीराधा यांचे प्राकट्य, श्रीराधा यांच्या रोमातून गोपिकांचे निर्माण झाले. भगवान श्रीकृष्णानेच आदिशक्ती महालक्ष्मी, महासरस्वती प्रकट केल्या. शिवशक्ती विवाहही त्यांचीच इच्छा होय. ब्रह्मदेवाकडून सृष्टी निर्माण ही श्रीकृष्ण परमात्म्याच्याच इच्छेने झाली. वैकुंठ, शिवलोक, गोलोक यांचे शाश्वत स्थान या पुराणात दिले आहे.
याच पुराणातील प्रकृती खंडात दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती, सावित्री आणि श्रीराधा या पंचदेवी म्हणजे प्रकृती असून सृष्टी या पंचदेवीवर अवलंबून असल्याचे प्रारंभीच स्पष्ट केले. परिपूर्णतम श्रीकृष्ण आणि चिन्मयी श्रीराधा यांच्या दिव्य तेजातून विराटस्वरूप बालक म्हणजे श्रीमहाविष्णू निर्माण झाल्याची कथा या पुराणात आहे. याज्ञवल्क्य यांनी केलेली भगवती सरस्वती स्तुती, गंगा उत्पत्ती कथा, तुळशी कथा, तुळशी वृक्ष जन्म, शाळिग्राम पाषाण निर्मिती कथा विस्ताराने आली आहे. वेदजननी सावित्री स्तुती, सावित्री उपासनेने राजा अश्वपतींना कन्यारत्न, त्या कन्यारत्नाचे नाव सावित्री, सत्यवान सावित्री कथा या पुराणात आहे.
भगवती लक्ष्मीचे समुद्रमंथनातून प्राकट्य, भगवती स्वाहा, स्वधा, दक्षिणा, षष्ठी, मंगलचंडी, मनसादेवी, आद्य गौमाता सुरभी यांचे उपाख्यान या पुराणात आहे. गणपती खंडात गणेश उत्पत्ती कथा, श्रीगणेशावर शनीचा दृष्टिपात, श्रीगणेशाला गजमुख लावण्याची कथा, गणपतींना अग्रपूजेचा मान, कार्तिकेय नंदी संवाद, गणेश यांची एकदंत होण्याची कथा, परशुराम कथा, गणेश स्तुती या पुराणात आहे.
श्रीकृष्ण जन्म खंडात श्रीकृष्ण जन्म वृत्तांत, गोकुळात आगमन, बाललीला, रासलीला, मथुरागमन, कंसवध, द्वारकापुरी निर्माण, रुक्मिणी हरण इत्यादी श्रीकृष्ण चरित्र या पुराणात आहे.ब्रह्मवैवर्त पुराणातील तत्त्व समजून घेणे गरजेचे आहे. इथे श्रीकृष्ण परमात्मा सर्वोपरी आहे. ते गोलोकधामात राहतात. त्यांच्या सोबत श्रीराधा आणि गोप-गोपिका राहतात. गोलोकधाम शिवलोक, वैकुंठ, भूलोकाच्याही वर आहे. जिथे जन्ममृत्यू जरा व्याधींना स्थान नाही. श्रीकृष्णाच्याच शरीरातून भगवान नारायण विष्णू आणि भगवान शिव प्रकट झाले. श्रीराधा ही श्रीकृष्णाच्या वामांगातून निर्माण झालेले व त्यांच्या हृदयात कायम निवासी असलेले कृष्णतत्त्वच आहे. श्रीराधा आद्याप्रकृती असून तिचे दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती, सावित्री ही रूपे आहेत. तिच्यातूनच गंगा, तुलसी, मनसा, स्वाहा, स्वधा इत्यादी रूपे उत्पन्न झालीत. श्रीराधा श्रीकृष्णाची तर श्रीकृष्ण श्रीराधेची आराधना करतात. म्हणजे ते परस्पर आराधक आणि आराध्य आहेत.
‘राधा भजति श्रीकृष्णम् स च तां च परस्परं ।
उभयो: सर्वसाम्यं च सदा संतो वदंति च ।।’
श्रीकृष्ण गोलोकात रासमंडलात असताना त्यांच्या वामभागातून उत्पन्न झाल्यामुळे श्रीराधा आयोनी आहेत. श्रीदामा यांच्या शापवाणीमुळे श्रीराधा यांना वाराहकल्पात गोकुळात श्रीवृषभानू आणि माता कलावती यांच्या पोटी जन्म घ्यावा लागला. असे असले तरी प्रत्यक्षात योगमायेने माता कलावतीच्या गर्भात वायू होता. जन्माच्या वेळी श्रीराधा तेथे स्वेच्छेने अयोनी प्रकट झाल्या. त्यांचे लग्न प्रसंगात त्यांचे पती श्रीरायान यांच्याशी श्रीराधा यांचा विवाह नसून श्रीराधा यांच्या छायारूपाशी विवाह झाला आणि त्या स्वयं अंतर्धान पावल्या. श्रीदामा यांच्या शापाने श्रीराधा यांना भूतलावर प्रकट व्हावे लागले; तद्वतच श्रीराधा यांच्या प्रतिशापाने श्रीदामा भूतलावर शंखचूड नावाच्या राक्षसरूपात जन्माला आले. त्यांचा विवाह तुळशी यांच्याशी झाला. तुळशीचे श्रीहरीकडून पातिव्रत्य भंग, शंखचूड वध, तुळशीचा श्रीहरीला श्राप, विष्णूचे शालिग्राम रूप तुळशीला हरिप्रिया म्हणून वरदान ही कथा या पुराणात दिली आहे. पुराण हा भारताचा इतिहास, भूगोल, परंपरा, संस्कृती सांगणारे वाङ्मय असून आपला वारसा आहे. त्यातही ब्रह्मवैवर्त पुराण अतीव रोचक, मधुर, ज्ञानवर्धक आणि कल्याणकारी आहे. त्याचा अभ्यास नव्या पिढीने केल्यास नवनीत निश्चित मिळेल.
प्रा. दिलीप जोशी
वाशिम/9822262735
---