धनश्री लोणकरने पटकावले सर्वाधिक ११ सुवर्णपदके

18 Mar 2026 19:23:01
नागपूर, 
dhanashree-lonkar : कष्ट, जिद्द आणि अभ्यासाच्या जोरावर यशाची शिखरे गाठणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्याचा सोहळा म्हणजे दीक्षांत समारंभ. कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या दीक्षांत सोहळ्यात यंदा अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीने विशेष ठसा उमटवला. यामध्ये धनश्री सुभाष लोणकर हिने सर्वाधिक ११ सुवर्णपदके आणि एक रोख पारितोषिक पटकावत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
 
 

ngp 
 
 
एम.ए. आचार्य (संस्कृत) मध्ये सर्वाधिक गुण मिळवत धनश्री लोणकर हिला कुलपती सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले. तिच्या या यशामुळे ती सर्व विद्याशाखांमधून अव्वल ठरली. तिच्या यशाची चर्चा संपूर्ण विद्यापीठात रंगली.
 
अष्टपैलू गुणवत्तेचा सन्मान म्हणून समर्थ सद्गुरू शंकर महाराज रसाळ स्मृती सुवर्णपदक अनुज रवी मंचावार याला प्रदान करण्यात आले. विविध क्षेत्रांत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्याची निवड करण्यात आली.
 
संशोधन क्षेत्रातही विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. वेदविद्या, संस्कृत व संस्कृतेतर भाषा, भारतीय धर्म व तत्त्वज्ञान, शिक्षणशास्त्र आणि प्राचीन भारतीय विज्ञान या विविध संकायांतील उत्कृष्ट प्रबंधांसाठी उन्मेष बोहटे, भारत मिसाळ, सानिका बाम, अतुल ठाकरे आणि देवुलपल्ली अन्वेष यांना सुवर्णपदके देण्यात आली. महानुभाव साहित्यावरील संशोधनासाठी भारत मिसाळ आणि गोविंद शिंदे यांना विशेष पारितोषिक मिळाले.
 
विविध अभ्यासक्रमांमध्ये प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये युवराज भोगांवकर, यश पांडे, नैना शेणॉय, सानिका शिंदे, अभिज्ञा देशपांडे, शीतल मदनकर, गुंजन कडू यांचा समावेश आहे. तसेच पदवी स्तरावरही अनेक विद्यार्थ्यांनी पदके व पारितोषिके मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केली.
 
मुक्त व दूरस्थ शिक्षण केंद्रातील विद्यार्थ्यांनीही उल्लेखनीय कामगिरी करत कुलगुरू पदके पटकावली. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांच्या कामगिरीमुळे विद्यापीठाच्या शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा अधिक अधोरेखित झाला.
Powered By Sangraha 9.0