३८ वर्षांनंतर माजी आमदार अशोक धवड यांची निर्दोष मुक्तता

18 Mar 2026 14:07:39
अनिल कांबळे
नागपूर,
mla ashok dhawad नागपूर रेल्वेस्थानक परिसरात झालेल्या आंदोलनाशी संबंधित तब्बल ३८ वर्षे जुन्या गुन्ह्यातून माजी आमदार अशोक शंकरराव धवड यांच्यासह इतर आरोपींना नागपूर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. सरकारी पक्षाला आरोप सिद्ध करता आले नाहीत, असे नमूद करत न्यायालयाने सर्व आरोपींची मुक्तता केली. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश मोहतसीम बदर यांनी हा निर्णय दिला.
 

अशोक धवड  
 
 
१ मे १९८८ रोजी मुंबईला जाणाऱ्या विदर्भ एक्स्प्रेसची वेळ रात्री १०.३० वाजताहून बदलून सायंकाळी ६.३० वाजता करण्याची मागणी करत रेल्वेस्थानकावर निदर्शने देण्यात आली. यादरम्यान पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर लाठीमार केला. आंदोलनादरम्यान आरोपींनी बेकायदेशीररित्या जमाव जमवून सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा निर्माण केला तसेच पोलिसांशी धक्काबुक्की करून त्यांना धमकावल्याचा आरोप होता. या प्रकरणात भारतीय दंड संहितेच्या कलम १४३, १४७, १४९, ३५३, ३३२, ३४१, ५०६ तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात अनेक आरोपींवर खटला दाखल करण्यात आला होता. दीर्घकाळ चाललेल्या न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान काही आरोपींचा मृत्यू झाल्याने त्यांच्याविरुद्धची कारवाई रद्द करण्यात आली. उर्वरित आरोपींविरुद्ध सुनावणी सुरू होती. सुनावणीदरम्यान न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की, सरकारी पक्षाने सादर केलेल्या पुराव्यांमधून आरोपींनी गुन्हा केल्याचे सिद्ध होत नाही. त्यामुळे फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम २३५ (१) अन्वये सर्व आरोपींना निर्दोष मुक्त करण्याचा आदेश देण्यात आला.mla ashok dhawad निर्णयानंतर न्यायालयाने आरोपींचे जामीन बॉण्ड रद्द केले असून, अपील प्रक्रियेच्या अनुषंगाने १५ हजार रुपयांचा वैयक्तिक बॉण्ड सादर करण्याचे निर्देश दिले.
पोलीस आयुक्तांना केली होती विनंती
दरम्यान, मार्च २०२५ मध्ये अशोक धवड यांच्यासह इतर आरोपींनी नागपूरच्या पोलीस आयुक्तांना त्यांच्यावरील खटले मागे घेण्याबाबत निवेदन दिले होते. यात शासकीय निर्णयाचा दाखला देत पाच लाख रुपयांपेक्षा नुकसान न झाल्यास खटला रद्द करण्याची विनंती करण्यात आली होती. बऱ्याच वर्षांपासून खटला प्रलंबित असल्याचा तसेच सर्व आरोपींचे वय ६५ ते ८० वर्षे असल्याचेही नमूद करण्यात आले होते
.
Powered By Sangraha 9.0