पुन्हा रंगणार भारत-पाकिस्तान सामना!

18 Mar 2026 10:00:40
नवी दिल्ली,
Hockey World Cup 2026 हॉकी विश्वचषक २०२६ साठी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढत ठरली असून दोन्ही संघांना एकाच गटात स्थान देण्यात आले आहे. या स्पर्धेचे आयोजन नेदरलँड्स आणि बेल्जियम संयुक्तपणे करणार असून, १५ ऑगस्ट रोजी सामने सुरू होतील आणि अंतिम सामना ३० ऑगस्ट रोजी पार पडेल. एफआयएचने पुरुष आणि महिला संघांसाठी गट निश्चित केले असून, भारतीय पुरुष आणि महिला दोन्ही संघांनी विश्वचषकातील आपले स्थान यशस्वीरित्या मिळवले आहे. पुरुष संघाला पाकिस्तानसह गट 'डी' मध्ये स्थान देण्यात आले आहे.
 

indiA Pak hockey 
 
ड्रॉ सोहळा १७ मार्च रोजी अॅमस्टरडॅममधील वॅग्नर स्टेडियममध्ये पार पडला. गट 'डी' मध्ये भारत आणि पाकिस्तान व्यतिरिक्त इंग्लंड आणि वेल्स यांचाही समावेश आहे. भारतीय पुरुष संघाचे सर्व सामने नेदरलँड्समध्ये खेळले जातील आणि त्याचे वेळापत्रक १८ मार्च रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे.गतविजेता जर्मनी, ज्याने २०२३ मध्ये भुवनेश्वर येथे बेल्जियमला हरवून आपले तिसरे विजेतेपद मिळवले होते, त्याला गट 'बी' मध्ये बेल्जियम, फ्रान्स आणि मलेशियासोबत स्थान देण्यात आले आहे.
 
 
भारत आणि पाकिस्तान यांची विश्वचषकातील कामगिरी आतापर्यंत प्रभावी राहिली आहे. पाच वेळा या दोन्ही संघांचा सामना झाला असून, भारताने तीन सामने जिंकले आहेत तर पाकिस्तानला दोन सामन्यात विजय मिळाला आहे. दोन्ही संघांनी शेवटचे सामन २०१० मध्ये नवी दिल्ली येथे खेळले होते, जिथे भारताने ४-१ अशा फरकाने विजय मिळवला होता. या घोषणेनंतर भारतीय पुरुष आणि महिला संघांसमोर आगामी हॉकी विश्वचषकात आपली छाप सोडण्याची मोठी संधी आहे.
पुरुष गटाचे गटवारीत स्थान:
गट 'ए' – नेदरलँड्स, अर्जेंटिना, न्यूझीलंड, जपान
गट 'बी' – बेल्जियम, जर्मनी, फ्रान्स, मलेशिया
गट 'सी' – ऑस्ट्रेलिया, स्पेन, आयर्लंड, दक्षिण आफ्रिका
गट 'डी' – इंग्लंड, भारत, पाकिस्तान, वेल्स
भारतीय महिला संघालाही गट 'डी' मध्ये स्थान देण्यात आले आहे. महिला संघासाठी गटवारी अशी आहे:
गट 'ए' – नेदरलँड्स, ऑस्ट्रेलिया, चिली, जपान
गट 'बी' – अर्जेंटिना, जर्मनी, अमेरिका, स्कॉटलंड
गट 'सी' – बेल्जियम, स्पेन, न्यूझीलंड, आयर्लंड
गट 'डी' – चीन, इंग्लंड, भारत, दक्षिण आफ्रिका
Powered By Sangraha 9.0