गोंदियात लव्ह जिहाद !

18 Mar 2026 19:58:18
गोंदिया, 
love-jihad-in-gondia : एका अल्पवयीन मुलीला मुस्लिम तरुणाने आमिष दाखवून तिचे अपहरण केले. त्यानंतर तिला मध्य प्रदेश राज्यात घेऊन जात तिच्यावर अत्याचार केला. ही घटना मंगळवारी (ता. १७) उघडकीस आली. या घटनेमुळे सकल हिंदू समाजाने आक्रमक भूमिका घेत आरोपीवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी बुधवारी (ता. १८) रामनगर पोलिस ठाणे गाठून एल्गार केला. दरम्यान, याप्रकरणी रामनगर पोलिसांनी आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, आरोपीला अटक केली आहे.
 

gond 
 
 
 
गोंदिया येथील एका मुलीला आरोपी मुस्लिम युवकाने आमिष दाखवून तिचे १३ मार्च रोजी अपहरण केले होते. या प्रकरणी मुलीच्या पालकांच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करीत मुलीचा शोध घेतला. ती मध्य प्रदेश राज्यातील बालाघाट जिल्ह्यात मिळून आली. दरम्यान, पोलिसांनी १६ मार्च रोजी मुलगी व आरोपीला घेऊन येत आरोपीला अटक केली. यावेळी मुलीने वैद्यकीय तपासणीला नकार दिल्याने आरोपीच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा नोंद केला होता. तथापि, आरोपीने धमकावल्यामुळे वैद्यकीय तपासणीला नकार दिल्याचे व आरोपीने लैंगीक छळ केल्याचे मुलीने सायंकाळी घरच्यांना सांगितले. यावर सदर मुलीची वैद्यकीय तपासणी करून आरोपीच्या विरोधात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेची माहिती सकल हिंदू समाज संघटनेला मिळताच शेकडो समाजबांधवांनी रामनगर पोलिस ठाणे गाठून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर, समाजबांधवांनी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय गाठून आरोपीवर कठोर करवाई करण्याची मागणी केली. तसे निवेदनही जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिले. येत्या सात दिवसांत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही दिला.
 
 
लव्ह जिहादचे हे प्रकरण असून अशा घटनांमध्ये वाढ होत आहे. सदर अल्पवयीन मुलीला प्रेमाचे आमिष दाखवून तिचा लैंगिक छळ करण्यात आला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंद केला असला तरी अपेक्षित असा प्रभाव झाला नाही. तेव्हा अशा घटना पुन्हा घडू नये, यासाठी आरोपीच्या घरावर बुलडोझर चालविण्यात यावे, अशी आपली मागणी असून तसे निवेदन दिले आहे. कारवाई न झाल्यास आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू.
-देवेश मिश्रा, विदर्भ प्रांत सहमंत्री, विश्व हिंदू परिषद
 
 
आरोपीच्या विरोधात पोक्सोअंतर्गत व विविध कलमान्वये गुन्हा नोंद केला आहे. बुधवारी (ता. १८) आरोपीला न्यायालयासमोर हजर केले होते. आरोपीला सहा दिवस पोलिस कोठडीची मागणी न्यायालयाकडे केली आहे.
-प्रवीण बोरकुटे, पोलिस निरीक्षक, पोलिस ठाणे, रामनगर.
Powered By Sangraha 9.0