‘वानरा’वर सोडलेला ट्रँक्युलायझर डार्ट लागला ‘नरा’ला ?

18 Mar 2026 20:04:06
तभा वृत्तसेवा
उमरखेड, 
yavatmal-news : पिसाळलेल्या वानराचा बंदोबस्त करण्यासाठी आलेल्या वन्यजीव विभागाच्या पथकाकडून एक मोठी चूक झाली. वानराला बेशुद्ध करण्यासाठी सोडलेला ट्रँक्युलायझर डार्ट चुकून एका नराला लागला. उमरखेड तालुक्यातील भवानी येथे मंगळवारी दुपारी 1 च्या सुमारास ही थरारक घटना घडली. गेल्या काही दिवसांपासून भवानी येथे एका पिसाळलेल्या वानराने उच्छाद मांडला होता. या वानराला जेरबंद करण्यासाठी वनविभागाच्या पथकाला पाचारण करण्यात आले होते.
 
 
monkey
 
 
मंगळवारी दुपारी जेव्हा ‘रेस्क्यू ऑपरेशन’ सुरू झाले, तेव्हा वानराला बेशुद्ध करण्यासाठी ‘शूटर’ने निशाणा धरला. मात्र, वानराच्या अचानक झालेल्या हालचालीमुळे ‘शूटर’चा अचूक निशाणा चुकला आणि गनमधून सुटलेला ट्रँक्युलायझर डार्ट थेट गर्दीत उभे असलेल्या सदानंद खराटे (डोंगरगाव, वय 45) यांना जाऊन लागला.
 
 
डार्ट लागताच खराटे जखमी झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. वनविभागाच्या या चुकीच्या कारवाईमुळे उपस्थित नागरिकांनी संताप व्यक्त केला. त्यामुळे काही काळ घटनास्थळी तणाव निर्माण झाला होता. जखमी सदानंद खराटे यांना तातडीने कोरटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले आहे.
 
असे काही नाही झाले
 
 
कोरटा वन्यजीव विभागांतर्गत भवानी येथे काही दिवसांपासून पिसाळलेल्या एका वानराने उच्छांद मांडला होता. गावकèयांनी याबाबत अनेकवेळा तक्रारी केल्या. त्या अनुषंगाने आम्ही बचाव पथकासह त्या वानराचा बंदोबस्त करण्यासाठी गेलो होतो. मात्र वानराला मारायचे इंजेक्शन वानराने उडी मारल्यामुळे जमिनीवर आदळल्या गेले. ते त्याठिकाणी उभे असलेल्या सदानंद खराटे यांच्या बाजूला पडले. खबरदारी म्हणून त्यांना कोरटा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र काही वेळातच डॉक्टरांनी त्यांना सुट्टी दिली. सदानंद खराटे हे बेशुद्ध पडल्याची अफवा आहे. जनतेने अशा अफवेवर विश्वास ठेवू नये.
- विशाल झांबरे
वनाधिकारी, वन्यजीव विभाग कोरटा.
Powered By Sangraha 9.0