नागपूर,
nagpur-news : कापडावर उमटणाऱ्या रंगांच्या थरांमध्ये जेव्हा कलाकाराची कल्पनाशक्ती जिवंत होते, तेव्हा ती केवळ कला राहत नाही, तर ती अनुभव बनते. शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालय, नागपूर येथे अशाच एका विलक्षण अनुभवाचा साक्षीदार बनण्याची संधी कला रसिकांना मिळाली. ५९ व्या वार्षिक कला प्रदर्शनानिमित्त आयोजित भव्य वुडब्लॉक प्रिंट प्रात्यक्षिकाने उपस्थितांना थक्क करून सोडले.
दिनांक १६, १७ आणि १८ मार्च या तीन दिवसांत पार पडलेल्या या उपक्रमात नागपूरचे प्रसिद्ध प्रिंटमेकर मंगेश कापसे यांनी महाराष्ट्रातील बहुधा सर्वात मोठी वुडब्लॉक प्रिंट साकारत एक नवा विक्रम प्रस्थापित केला. सुमारे ८ फूट × १६ फूट एवढ्या प्रचंड आकाराच्या लाकडी ब्लॉकवरून कापडावर छाप घेण्याची प्रक्रिया प्रत्यक्ष सादर करण्यात आली.
या प्रात्यक्षिकातून दोन भव्य प्रिंट्स यशस्वीरित्या तयार करण्यात आल्या. या संपूर्ण प्रक्रियेत एम.एफ.ए. तसेच बी.एफ.ए. तृतीय वर्ष (रेखा व रंगकला) विभागातील विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग होता. विद्यार्थ्यांच्या उत्साहपूर्ण सहकार्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर छपाई करणे शक्य झाले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना मुद्रणकलेतील तांत्रिक बारकावे आणि मोठ्या आकारातील कामाचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला. अधिष्ठाता प्रा. डॉ. विश्वनाथ साबळे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या मुद्रणकला विभागाने यशस्वीरित्या केले.
या अनोख्या प्रात्यक्षिकामुळे वार्षिक कला प्रदर्शनाला भेट देणाऱ्या रसिकांसाठी हा उपक्रम विशेष आकर्षण ठरला. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला नवी दिशा आणि प्रयोगशीलतेला प्रेरणा देणारा हा अनुभव ठरला.
प्रिंट मेकिंग मधला एक महत्वाचा असलेल्या उत्कट या प्रकारात मला विशेष आवड असल्याने हा प्रकल्प करण्याचे मी ठरवले. तब्बल ९ महिन्यांपासून या लाकडी ब्लॉक वर कोरीव काम सुरु होते. त्यानंतर गेल्या २-३ दिवसांपासुन आम्ही या मोठ्या लाकडी ब्लॉक्सच प्रिंट काढण्यासाठी कार्यरत आहोत. या प्रकल्पामुळे कला क्षेत्रातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे हे या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट होते. या प्रकल्पावर विद्यार्थ्यांसोबत काम करताना एक वेगळाच आनंद मला अनुभवायला मिळाला.
- प्रसिद्ध प्रिंटमेकर मंगेश कापसे