मी जिवंत आहे!

18 Mar 2026 10:56:59
जेरुसलेम,
Netanyahu's new video इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या मृत्यूबाबत सुरू असलेल्या अफवांदरम्यान त्यांचा आणखी एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओद्वारे त्यांनी आपण सुरक्षित आणि जिवंत असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या या दृश्यांमध्ये ते अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे दूत माईक हकाबी यांच्यासोबत दिसत आहेत.या भेटीदरम्यान हकाबी यांनी विनोदी शैलीत सांगितले की, राष्ट्राध्यक्षांनी त्यांना नेतान्याहू यांच्या प्रकृतीची खात्री करण्यासाठी पाठवले आहे. त्यावर नेतान्याहू हसत उत्तर देताना “मी जिवंत आहे” असे स्पष्टपणे म्हणाले. त्यांच्या मृत्यूच्या अफवांवर टोला लगावत त्यांनी हस्तांदोलन करताना “आमच्याकडे दोन्ही हातांवर पाचच बोटे आहेत” असेही नमूद केले.
 

kashish 
 
 
अलीकडेच त्यांच्या नावाने प्रसारित झालेल्या एका बनावट व्हिडिओमध्ये सहा बोटे दाखवण्यात आल्याने त्यांनी हा उल्लेख केला.नेतान्याहू यांनी यापूर्वीही सामाजिक माध्यमांवर अनेक व्हिडिओ शेअर करून आपण सुरक्षित असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी एका कॅफेमधील व्हिडिओ प्रसिद्ध केला होता, मात्र त्याच्या सत्यतेवरही शंका उपस्थित करण्यात आली होती. काही ऑनलाइन वापरकर्त्यांनी तो बनावट असल्याचा दावा केला होता. दरम्यान, या नव्या व्हिडिओमध्ये नेतान्याहू यांनी इराणवर टीका करत काही महत्त्वाच्या नेत्यांच्या मृत्यूचा उल्लेख केला. इस्रायलने या कारवाईची जबाबदारी स्वीकारली असून इराणनेही त्याची पुष्टी करत प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे. या सर्व घडामोडींमुळे मध्यपूर्वेतील तणाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0