मुंबई/संगमनेर
Sangamner acid attack संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथे सहावीत शिकणाऱ्या ११ वर्षीय शाळकरी मुलीवर झालेल्या भीषण ॲसिड हल्लाचे पडसाद राज्यभर उमटत असतानाच, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या शालेय काळातील गाजलेल्या रिंकू पाटील प्रकरण ची आठवण काढत समाजातील विकृत मानसिकतेवर बोट ठेवले.
“मी दहावीत असताना रिंकू पाटीलसोबत घडलेली घटना आजही आठवते. अशा घटना घडण्यामागे समाजातील विकृत मानसिकता कारणीभूत असते,” असे सांगताना मुंडे यांनी कायद्याचा धाक आणि सामाजिक जबाबदारी यावरही भाष्य केले. गुन्हेगारांना रोखण्यासाठी कायद्याची कडक अंमलबजावणी आवश्यक असली तरी अशा गुन्ह्यांमागे व्यक्तीची मानसिकता देखील तितकीच जबाबदार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.मुंडे यांनी पुढे सांगितले की, राज्यात महिलांविरोधातील गुन्ह्यांबाबत कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली असून त्यामुळे महिलांमध्ये तक्रार नोंदवण्याची जागरूकता वाढली आहे. “कायद्याचा धाक आहे म्हणूनच महिलांना पुढे येऊन तक्रार करण्याचा आत्मविश्वास मिळतो. ही घटना अत्यंत गंभीर असून दोषींवर निश्चितच कठोर कारवाई होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ संगमनेरमधील वडगावपान चौफुलीवर संतप्त विद्यार्थिनी रस्त्यावर उतरल्या आणि रास्ता रोको आंदोलन केले. त्यांनी सरकारकडे सुरक्षेची मागणी करत कठोर पावले उचलण्याची मागणी केली.या प्रकरणात भाजप आमदार चित्रा वाघ यांनीही ठाम भूमिका घेत आरोपीला लवकरच अटक करून कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल, असे स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे स्वतः या प्रकरणावर लक्ष ठेवून असून संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत, असे त्यांनी सांगितले. महिला आणि बालकांच्या सुरक्षेबाबत ‘झिरो टॉलरन्स’ची भूमिका कायम असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.दरम्यान, हल्ल्यातील आरोपी अद्याप फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे राज्यभर संताप व्यक्त होत असून, शाळकरी मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.