सिंदी (रेल्वे),
encroachment-removal-campaign : शहरातील वाढत्या अतिक्रमणाच्या पृष्ठभूमीवर नपने आज बुधवार १८ रोजी अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली. या कारवाईपूर्वी संबंधित व्यावसायिक व नागरिकांना नगर परिषदेकडून लेखी व तोंडी सूचना देण्यात आल्या होत्या.
नगर परिषद प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील मुख्य बाजारपेठेच्या रस्त्यावर तसेच परिसरातील सार्वजनिक जागांवर अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या टपर्या, शेड, फलक व इतर अडथळे आज हटविण्यात आले. अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. कारवाई दरम्यान काही व्यावसायिकांनी सहकार्याची भूमिका घेतली, तर काही ठिकाणी किरकोळ वादही झाले. मात्र, प्रशासनाने पूर्वसूचना दिल्यामुळे बहुतांश ठिकाणी कारवाई सुरळीत पार पडली, असे मुख्याधिकारी पौर्णिमा गावित यांनी सांगितले.
या मोहिमेत नगर परिषद कर्मचारी, पोलिस प्रशासन तसेच संबंधित विभागांचे अधिकारी सहभागी झाले होते. शहराचा विकास व सुव्यवस्था राखण्यासाठी अतिक्रमण हटविणे आवश्यक झाले होते. भविष्यातही अशा प्रकारची कारवाई सातत्याने करण्यात येईल. नागरिकांनी व व्यावसायिकांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी गावित यांनी केले.