ताडोबातील ते खांब भोसलेकालीन

18 Mar 2026 19:48:07
चंद्रपूर, 
suresh-chopane : चंद्रपूर ते नागपूरला जाण्यासाठी तयार केलेला रस्ता आणि रस्ता ओळखण्यासाठी बांधलेले दगडी आणि विटांचे खांब हे ब्रिटिश किंवा गोंड राजांनी बांधलेले नसून, चंद्रपूर ते नागपूर येथे जाण्या-येण्यासाठी भोसले राजाने बांधले आहेत, अशी माहिती सुरेश चोपणे यांनी दिली.
 
 
kj
 
 
 
यातील बहुतेक रस्त्यावरील खांब तुटले असले, तरी ताडोबात मात्र अशी खांब सुरक्षित राहिली आहेत. चंद्रपूर ते ताडोबा तलावापर्यंत ते वाळूच्या दगडापासून बनविली असून, पुढे नागपूरसाठी काही खांब विटापासून बनविली आहेत. खांबाच्या वर यू आकाराचे दगड मांडलेले आहेत. हे दगड पुढील खांबाकडे दिशा दाखविण्यासाठी तयार केली असून, क्वचित प्रसंगी वन्यजीव सुरक्षेसाठी दोरी आणि घंटा बांधण्यासाठी उपयोग केल्या जात असावा, अशी माहिती चोपणे यांनी दिली.
 
 
ब्रिटिश प्रत्येक बांधकामाची बिले, माहिती लिहून ठेवत असे. या खांबाची माहिती चंद्रपूर गॅझेटियरमध्ये किंवा आर्थिक अहवालात प्रकाशित झालेली नाही. ताडोबाच्या काही संकेतस्थळावर हे खांब गोंडकालीन असल्याचा अंदाजे व्यक्त केला आहे. परंतु, सर्व राजांचा शास्त्रशुद्ध अभ्यास केल्यानंतर चंद्रपूर ते नागपूर येथे जाण्यासाठी भोसले यांनीच हे खांब बांधल्याचे पुरावे असल्याचा दावा चोपणे यांनी केला आहे.
 
भोसलेंचा इतिहास
 
 
रघुजी भोसलेंनी पुणे येथून नागपूर आणि चंद्रपूर येथे आक्रमण करून गोंड राज्यावर 100 वर्षे राज्य केले. रघुजीने चंद्रपूरच्या नीलकंठ शहाचा पराभव केला. त्यांना नागपूर ते चंद्रपूर येथे सतत यावे लागत असे. त्यामुळे त्यांनी नागपूर ते ताडोबा आणि चंद्रपूर येथे येण्यासाठी हा मार्ग निवडला. चंद्रपूर आणि सावली येथेसुद्धा मोठ्या प्रमाणावर कापूस आणि सुती वस्तू, कपडे तयार केले जात होते. हा व्यापार नागपूर येथे चालू करावा यासाठी चंद्रपूर-नागपूर रस्ते व्हावे म्हणून भोसलेंनी प्रयत्न केला. लोकांना आणि भोसलेंना रस्ते दिसावे यासाठी दगडी आणि विटाचे खांब उभारले.
Powered By Sangraha 9.0