गारपिटीसह अवकाळी पावसाला सुरुवात!

18 Mar 2026 12:19:57
मुंबई,
Unseasonal rains begin with hail राज्यात पुन्हा एकदा अवकाळी हवामानाने थैमान घालण्यास सुरुवात केली असून नागरिक आणि शेतकरी चिंतेत सापडले आहेत. भारतीय हवामान विभाग यांच्याकडून राज्यभर पावसाचा इशारा देण्यात आला असून अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. विशेषतः विदर्भातील शहरांमध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी जोरदार सरी कोसळत आहेत. पुढील काही दिवस असेच वातावरण राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.नागपूर आणि आसपासच्या भागात उष्णतेचा तडाखा जाणवत असतानाच अचानक हवामान बदलून पावसाचे वातावरण तयार झाले आहे. अमरावती आणि पश्चिम विदर्भातही ढग दाटून आले असून काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी बरसत आहेत. या अवकाळी पावसाचा फटका रब्बी हंगामातील हरभरा आणि गहू पिकांना बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
 
 

Unseasonal rains 
दरम्यान, गडचिरोली जिल्ह्यात पहाटेच्या सुमारास वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली. विजांचा कडकडाट आणि वाऱ्याच्या वेगामुळे काही काळ वीजपुरवठाही खंडित झाला. काही मिनिटांच्या पावसानंतरही वातावरणात मोठा बदल जाणवला असून उन्हाळ्यात अचानक पावसाळ्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. गडचिरोलीसह अहेरी, भामरागड, सिरोंचा आणि चामोर्शी परिसरातही हवामानात लक्षणीय बदल दिसून आला.
 
पश्चिम महाराष्ट्रातही या बदलत्या हवामानाचा परिणाम दिसून आला. सांगली जिल्ह्यातील मिरज परिसरात गारांसह झालेल्या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शाळूचे पीक जमिनीवर पडल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले असून मदतीची मागणी जोर धरत आहे. त्याचप्रमाणे लातूर जिल्ह्यातही वादळी वाऱ्यासह पाऊस पडला असून अनेक तालुक्यांत गारपिटीमुळे आंबा, गहू, ज्वारी आणि हरभरा पिकांचे नुकसान झाले आहे. याचबरोबर धाराशिव आणि हिंगोली जिल्ह्यांतही मध्यरात्री वादळी पावसाने हजेरी लावली. राज्यात उष्णतेची लाट सुरू असतानाच अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे वातावरणात मोठी उलथापालथ झाली असून पुढील काही दिवस असेच अस्थिर हवामान कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
Powered By Sangraha 9.0