forest tourism rules सेलू तालुक्यातील बोर व्याघ्र प्रकल्पात जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील पर्यटक जंगल सफारीचा आनंद लुटण्यासाठी येतात. पण वनपर्यटनाच्या नियमांना बगल दिल्याने बोर व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्रातील ४ जिप्सी व ४ गाईडला १० दिवसांकरिता निलंबीत करण्यात आले आहे.
जंगल सफारी करते वेळी पर्यटक, जिप्सी चालक, गाईड यांनी नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. पण १६ मार्चला सकाळच्या फेरीदरम्यान बोरधरण पर्यटन गेट येथून बोर व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्रात जंगल सफारीसाठी गेलेल्या एम. एच. ३२ ए. एच. १२३५, एम. एच. १२ यू. एम. ०१०१, एम. एच. ३२ ए. एच. १३०७, एम. एच. ३२ ए. एच. २४४१ क्रमांकाच्या जिप्सीच्या चालकाने तसेच विक्रम चिकराम, सचिन लोखंडे, मंगेश खोब्रागडे, मनोज वाघमारे या गाईडने पर्यटकांना वेळेपूर्वी पर्यटन क्षेत्रातून बाहेर काढले. शिवाय बफर क्षेत्रात ते पर्यटकांना घेऊन वावरताना आढळून आले. तर एक जिप्सी वाहन हे निर्धारित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशीरा पर्यटन क्षेत्रात प्रवेश केल्याचे दिसून आले. हा संपूर्ण प्रकार नियमांना धाब्यावर बसवणारा असल्याने जिप्सी व गाईड यांना २६ मार्चपर्यंत निलंबीत करण्यात आले आहे.
असे आहेत आरोप?
* एम. एच. ३२ ए. एच. १२३५ क्रमांकाचा जिप्सी चालक व गाईड विक्रम चिकराम यांच्यावर पर्यटकांसह निर्धारित वेळेपेक्षा २ तास पूर्वी पर्यटन क्षेत्राबाहेर आल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
* एम. एच. १२ यू. एम. ०१०१ क्रमांकाचा जिप्सी चालक तसेच गाईड सचिन लोखंडे याच्यावर पर्यटकांसह निर्धारित वेळेपेक्षा अडीच तास पूर्वी पर्यटन क्षेत्राबाहेर आल्याचा आरोप ठेवत निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
* एम. एच. ३२ ए. एच. १३०७ क्रमांकाचा जिप्सी चालक व गाईड मंगेश खोब्रागडे यांच्यावर पर्यटकांसह निर्धारित वेळेपेक्षा दीड तास पूर्वी पर्यटन क्षेत्राबाहेर आल्याचा आरोप आहे.
* एम. एम. ३२ ए. एच. २४४१ क्रमांकाचा जिप्सी चालक व गाईड मनोज वाघमारे यांच्यावर पंधरा मिनीट उशीरा पर्यटन क्षेत्रात जंगल सफारीसाठी प्रवेश केल्याचा आरोप आहे.