गडचिरोलीत ११ वरिष्ठ माओवाद्यांचे आत्मसमर्पण; नक्षल चळवळीला मोठा धक्का

    दिनांक :19-Mar-2026
Total Views |
गडचिरोली,
जिल्ह्यात नक्षलविरोधी मोहिमेत मोठे यश मिळवत गडचिरोली पोलीस व सीआरपीएफसमोर ११ वरिष्ठ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले. आत्मसमर्पण केलेल्यांमध्ये डिव्हीसीएम, एरिया कमिटी सचिव, पीपीसीएम, कमांडर व एसीएम अशा महत्त्वाच्या पदांवरील माओवाद्यांचा समावेश असल्याने नक्षल चळवळीला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
या सर्व माओवाद्यांवर शासनाने एकत्रित सुमारे ६८ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. पोलिसांच्या सातत्यपूर्ण कारवाया, प्रभावी धोरणे आणि शासनाच्या आत्मसमर्पण व पुनर्वसन योजनेमुळे माओवाद्यांचा मुख्य प्रवाहाकडे कल वाढत असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे.
 
Gadchiroli
 
गडचिरोली जिल्ह्यात कधीकाळी १० उपविभागांत सक्रिय असलेली माओवादी चळवळ आता जवळपास संपुष्टात येण्याच्या स्थितीत असून ती केवळ भामरागड उपविभागाच्या सीमावर्ती भागापुरती मर्यादित राहिली आहे. सन २००५ पासून राबविण्यात येत असलेल्या आत्मसमर्पण धोरणामुळे व हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून अनेक जहाल माओवाद्यांनी शस्त्र टाकण्याचा मार्ग स्वीकारला आहे. आतापर्यंत एकूण ७९४ माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले असून, २०२५ पासून आजपर्यंत ही संख्या १२३ पर्यंत पोहोचली आहे.
 
विशेष म्हणजे, ऑक्टोबर २०२५ मध्ये माओवादी संघटनेतील वरिष्ठ नेता मल्लोजुला वेनुगोपाल राव उर्फ भूपती उर्फ सोनू याच्यासह ६१ माओवाद्यांनी ५४ शस्त्रांसह आत्मसमर्पण केल्यानंतर संपूर्ण दंडकारण्य क्षेत्रातील नक्षल चळवळीला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर देशभरातही मोठ्या प्रमाणात आत्मसमर्पणाची लाट दिसून आली आहे.
आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांमध्ये छत्तीसगड व गडचिरोली परिसरातील विविध दलम व संघटनांमध्ये कार्यरत सदस्यांचा समावेश आहे. काही जण अनेक वर्षांपासून सक्रिय असून त्यांच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. यमुनक्का पेंदाम हिच्यावर २७ गुन्हे तर धनु वेळंजे याच्यावर १६ गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.
शासनाच्या धोरणानुसार आत्मसमर्पण करणाऱ्यांना आर्थिक मदत व पुनर्वसनाची सुविधा दिली जाणार आहे. काही माओवाद्यांना ८.५ लाख रुपयांपर्यंतची मदत जाहीर करण्यात आली असून गटाने आत्मसमर्पण केल्यास अतिरिक्त प्रोत्साहनही देण्यात येणार आहे.
 
या वेळी विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) संदिप पाटील यांनी उर्वरित माओवाद्यांना हिंसेचा मार्ग सोडून लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचे आवाहन केले. “शस्त्र टाकून सन्मानाने जीवन जगण्याची हीच योग्य वेळ आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
 
कार्यक्रमास पोलीस उपमहानिरीक्षक अंकित गोयल, सीआरपीएफचे उपमहानिरीक्षक अजय कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक नीलोत्पल तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या कारवाईसाठी विशेष अभियान पथक व पोलीस दलातील विविध शाखांनी समन्वयाने काम करत महत्त्वाची भूमिका बजावली.