शालिवाहन शके 1948 (2026-27) - गुढीपाडवा

19 Mar 2026 05:30:00
विशेष...
ज्यो. विद्या राजंदेकर
gudi padwa या वर्षी नवीन शालिवाहन शक 1948 ‘पराभव’ नामक संवत्सराचा आरंभ फाल्गुन कृ. 30 सह चैत्र शु. 1 गुरुवारी सकाळी 6 वा. 53 मि. नंतर होत आहे. प्रतिपदा क्षयतिथी असल्याने नूतन वर्षारंभ, गुढीपाडवा गुरुवार 19 मार्च 2026 रोजीच होईल. या दिवशी सकाळी 6 वा 53 मि. नी. गुढी उभारावी. गुढीचे पूजन करून प्रार्थना करावी. गुढी पूजनाचे वेळी पुढील मंत्राने प्रार्थना करावी ‘‘ब्रह्मध्वज नमस्तेतु सर्वाऽभिष्ट फलप्रद। प्राप्तेेऽस्मिन्वत्सरे नित्यं मद्गृहे मंगलं कुरु ।’’ नवीन पंचांग व त्यावरील गणपतीचे पूजन करावे, संवत्सर फल वाचावे. गुढीपाडवा हा साडेतीन स्वयं सिद्ध मुहूर्तातील एक पूर्ण मुहूर्त आहे. आपणा सर्वांना शके 1948 पराभव नाम संवत्सर सुखसमृद्धीचे व भरभराटीचे जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना.
 

gudi padwa 
 
 
- यावर्षी 17 मे 2026 ते 15 जून 2026 अधिक ज्येष्ठ मास येणार आहे.
- तसेच 31 ऑक्टोबर 2026 ते 24 जानेवारी 2027 या कालात गुरू सिंह राशीत असल्याने सिंहस्थ पर्वकाल आहे. या कालात श्री क्षेत्र नाशिक -त्रयंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा आहे.
 
या चैत्र शुक्ल प्रतिपदेला शालिवाहन शक 1948 पराभव नामक सुरू होत आहे. या पराभव नामक संवत्सरात राजपद गुरूकडे, मंत्रिपद मंगळाकडे, मेघांचे आधिपत्य चंद्राकडे, अग्रधान्याचा (खरीप पिकांचा) स्वामी गुरू, रसपदार्थांचा स्वामी शनि, रबीच्या पिकांचा स्वामी बुध आहे. मध्यधान्याचा अधिपति बुध आहे. या पराभव नाम संवत्सरात पाऊस थोडा मध्यम, परंतु पिके चांगली येतील. देशविदेशात युद्धाचे वातावरण राहील. रोगराई वाढेल. राजपद गुरू या शुभ ग्रहाकडे असल्याने त्याच्या अंमलाखालील गुजरात, विदर्भ भागात पाऊस योग्य प्रमाणात पडेल. फळे व धान्याचे उत्पादन चांगले होईल. समाजात यज्ञयाग इ. धार्मिक कृत्ये होतील. रोगराई प्रमाण कमी राहील.
 
मंत्रिपद मंगळाकडे असल्याने धान्याची महागाई, आग, चोर यापासून नुकसान व युद्धजन्य परिस्थिती राहील. मेघांचा अधिपति चंद्र असल्याने ऊस, धान्य, फुले, दुधदुभते चांगले भरपूर येतील. नद्या, विहिरी, तळी यात भरपूर पाणी राहील. विद्वानांचा गौरव होईल. अग्रधान्याचा (खरीप पिकांचा) स्वामी गुरू आहे. त्यामुळे पृथ्वीवर पाऊस पाणी चांगले, धान्य व फळांचे उत्पादनही चांगले होईल. जनता आनंदित राहील. रसपदार्थांचा स्वामी शनि असल्याने लोकर, नीळ, लोखंड यांच्या किमती थोड्या कमी होतील. सोने, चांदी, पारा महाग होईल. रब्बीच्या पिकांचे आधिपत्य बुधाकडे आहे. त्यायोगे गहू, तांदूळ, मूग, ऊस यांचे उत्पादन चांगले, दुधदुभते भरपूर होईल. जनतेची शास्त्र अभ्यासाकडे प्रवृत्ती वाढेल. मध्यधान्याचा अधिपतीी बुधच असल्याने पाऊसपाणी मध्यम, तांबड्या काळ्या जमिनीत चांगली पिके येतील.
 
यावर्षी निज ज्येष्ठ शुक्ल अष्टमी सोमवार, हस्त नक्षत्र, वरियान् योग, बव करणावर सूर्योदयापासून दुपारी 12 वा. 23 मि. नी. सूर्य आर्द्रा नक्षत्रात प्रवेश करतो. त्यायोगे धान्य व वस्त्रे यांची थोडी वृद्धी होईल, सर्व वस्तूंची सुबत्ता राहील. जनतेला धनधान्य भरपूर मिळून जनता सुखी राहील.gudi padwa या वर्षात काल नावाचा मेघ वृष्टी करणार आहे व तक्षक नावाचा नाग पृथ्वी धारण करणार आहे. त्यायोगे देशविदेशात युद्धजन्य परिस्थिती राहील. या वर्षात रोहिणी नक्षत्र समुद्रावर पडले आहे. ते पर्जन्यवृष्टी चांगली होऊन सर्व धान्ये भरपूर येतील असे दर्शविते.
हे शुभकारक वर्षफल गुढीपाडव्याचे दिवशी श्रवण केल्याने लक्ष्मीची व आयुष्याची वृद्धी होऊन नवीन वर्ष सुखसमाधानाचे जाते.
 
।। श्री गजाननार्पणमस्तु ।। श्रीरस्तु ।। शुभं भवतु ।।
 
(लेखिका महाराष्ट्रीय पंचांगकर्त्या आहेत.)
Powered By Sangraha 9.0