कराचीत वादळाचा तडाखा; २१ जणांचा मृत्यू

19 Mar 2026 14:54:19
कराची,
storm karachi कराची येथे बुधवारी आलेल्या वादळ आणि मुसळधार पावसामुळे मोठी जीवितहानी झाली असून किमान २१ जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण जखमी झाले आहेत. अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, वाऱ्याचा वेग ताशी सुमारे ९७ किलोमीटरपर्यंत पोहोचला होता. या जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी भिंती कोसळल्या, झाडे उन्मळून पडली आणि घरांची छपरे उडून गेली.
कराचीत वादळाचा तडाखा 
 
 
सर्वात मोठी दुर्घटना बाल्दिया टाऊन परिसरात घडली, जिथे पावसापासून बचावासाठी भिंतीलगत उभ्या असलेल्या लोकांवर भिंत कोसळली. या घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला. याशिवाय, कुरंगी परिसरात घराचे छत कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला, तर मेमन गोठ येथे एका व्यक्तीचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. गुलिस्तान-ए-जोहरमध्ये भिंत कोसळून चार वर्षांच्या मुलीचा जीव गेला, तर नीलम कॉलनीत झाड पडल्याने एका महिलेचा मृत्यू झाला.
 
 
वादळाच्या तडाख्यामुळे शहरातील अनेक भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला असून रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात ढिगारे साचले आहेत. यामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.
 
दरम्यान, बचाव पथके घटनास्थळी पोहोचून ढिगारे हटवण्याचे आणि अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे काम करत आहेत.storm karachi हवामान खात्याने पुढील काही तासांतही परिस्थिती गंभीर राहण्याचा इशारा दिला असून नागरिकांनी सतर्क राहावे आणि अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0