ठाणे,
Actress arrested in Thane ठाणे शहरात मनोरंजन क्षेत्राशी संबंधित एका अभिनेत्रीला अनैतिक मानवी वाहतूक प्रकरणात अटक करण्यात आली असून या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे. नवोदित कलाकार तरुणींना अधिक मानधनाचे आमिष दाखवून देहव्यापारात ओढल्याचा आरोप तिच्यावर आहे. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने रचलेल्या सापळ्यात ही कारवाई करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, दूरचित्रवाणी मालिकांमध्ये तसेच मॉडेलिंग क्षेत्रात कामाच्या शोधात असलेल्या तरुणींना जास्त पैशांचे आश्वासन देऊन आरोपी त्यांना अनैतिक व्यवसायाकडे वळवत होती. याबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या माध्यमातून जाळे टाकले. ठरलेल्या व्यवहारासाठी आरोपीने तीस हजार रुपये स्वीकारल्यानंतर पोलिसांनी तिला मासुंदा तलाव परिसरात ताब्यात घेतले.
या कारवाईदरम्यान दोन तरुणींची सुटका करण्यात आली असून त्यांना संरक्षणासाठी महिला निवारा केंद्रात पाठविण्यात आले आहे. चौकशीत आरोपीने गेल्या सुमारे वर्षभरापासून हा प्रकार सुरू असल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. ती स्वतः काही हिंदी मालिकांमध्ये लहान भूमिका करत असल्याची माहिती पुढे आली आहे. तसेच ओळखीतील काही महिलांना व तरुणींनाही या व्यवसायात सहभागी होण्यासाठी प्रवृत्त केले जात असल्याचे तपासात उघड झाले आहे. उपायुक्त अमरसिंह जाधव आणि सहायक पोलिस आयुक्त रवींद्र दौंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैशाली गोरडे, उपनिरीक्षक स्नेहल शिंदे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणामुळे मनोरंजन क्षेत्रातही चर्चेला उधाण आले आहे.