नवी दिल्ली,
England's tweet after India's victory आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताने वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला आहे. मायदेशात सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने सुपर आठ फेरीतील शेवटच्या सामन्यात १९६ धावांचे आव्हान १९.२ षटकांत पाच गडी गमावून पूर्ण केले. उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला सामना रंगणार आहे, तर भारताचा सामना इंग्लंडशी होणार हे स्पष्ट झाले आहे. भारताच्या प्रवेशानंतर इंग्लंडच्या क्रिकेट मंडळाने समाजमाध्यमावर एक छायाचित्र प्रसिद्ध करत उपांत्य फेरीत भारताविरुद्ध सामना होणार असल्याची घोषणा केली. त्या संदेशात इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूक याचा फोटो प्रसिद्ध करण्यात आला असून मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथे हा सामना होणार असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
या घोषणेनंतर दोन्ही संघांच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली असून उपांत्य फेरीतील भारत-इंग्लंड लढतीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. या सामन्यापूर्वी उपांत्य फेरीत पोहोचणाऱ्या चौथ्या संघाबाबत अनिश्चितता होती. न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांनी यापूर्वीच आपली जागा पक्की केली होती. त्यामुळे भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामना दोन्ही संघांसाठी निर्णायक ठरला. विंडीजने दिलेले आव्हान कठीण असले तरी भारतीय फलंदाजांनी संयम राखत विजय मिळवला आणि पुढील फेरीचे तिकीट निश्चित केले. या विजयात संजू सॅमसनने नाबाद ९७ धावांची खेळी करत संघाच्या यशात मोलाचा वाटा उचलला. त्याच्या या शानदार कामगिरीबद्दल त्याला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा सन्मान देण्यात आला.