संवाद साधताना मराठी भाषेला प्राधान्य द्या : अंजनाबाई खुणे

02 Mar 2026 19:48:02
मराठी भाषा गौरव दिन
 
देवळी, 
आज दिवसेंदिवस मराठी भाषेचा वापर कमी होत असताना दिसत आहे. 'Maraṭhi bhasha din' मराठीसोबत अनेक इंग्रजी शब्द आपण मातृभाषा म्हणूनच वापरत आहोत. यामुळे मराठी भाषेतील अनेक शब्द कालबाह्य होत आहे. मराठी ही आपली मातृभाषा असल्यामुळे आपण दररोजच्या संवादात प्राधान्य दिले पाहिजे. इंग्रजी भाषा बोलण्याबद्दल माझा आक्षेप नाही तर मराठी भाषेला दूर करण्यावर माझा आक्षेप आहे. आपल्या भावना, संवेदना व समजेल असा संवाद केवळ आपण आपल्या मातृभाषेतूनच करू शकतो. म्हणून संवाद साधताना मराठी भाषेला प्राधान्य द्या, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवयित्री झाडीपट्टीतील बहिणाबाई म्हणून ओळखल्या जाणार्‍या अंजनाबाई खुणे यांनी केले.
 
 
marathi
 
. 'Maraṭhi bhasha din'  मराठी भाषा गौरव दिनानिमित्त स्थानिक एस. एस. एन. जे. महाविद्यालयातील मराठी विभाग व एनसीसी विभाग यांच्या संयुत वतीने आयोजित कार्यक्रमात त्या प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या. अध्यक्षस्थानी मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. प्रभाकर ढाले तर प्रमुख अतिथी म्हणून आकाशवाणी नागपूर उद्घोषिका तथा कवयित्री ऋचा वगरकर मांजरखेडे व एनसीसी अधिकारी कॅप्टन मोहन गुजरकर उपस्थित होते. यावेळी कवी कुसुमाग्रज यांच्या कवितांचे वाचन कवयित्री ऋचा वगरकर-मांजरखेडे यांनी करून, मराठी भाषेचे वैभव यावर विस्तृत विवेचन केले. यावेळी अंजनाबाई खुणे यांनी आपल्या झाडीपट्टीतील बोलीमध्ये स्वरचित कवितांचे वाचन करीत विद्यार्थ्यांना कविता लिखाणासाठी मार्गदर्शन केले.
 
 
. 'Maraṭhi bhasha din'  कॅप्टन मोहन गुजरकर यांनी, मराठी भाषा व आपली आई यांचा संबंध जोडून मराठी भाषेला वैभव प्राप्त करून देणे, आपल्या प्रत्येक मराठी माणसांचे कर्तव्य आहे यादृष्टीने आपण प्रयत्न करूया, असे आवाहन केले. तर प्रा. डॉ. ढाले म्हणाले, आपण मराठी भाषेतच संवाद साधला पाहिजे. तसेच आवश्यक त्या ठिकाणी मराठी शब्दांचे उचित प्रयोजन केले पाहिजे. आपली मराठी भाषा, संस्कृती टिकवणे हे आपल्याच हातात आहे, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी झारखंड येथे संपन्न झालेल्या मेरा युवा भारत अंतर्गत आंतरराज्य युवा आदान प्रदान शिबिरात सहभागी सत्तेश्वरी सावरकर, जान्हवी ज्ञोड, पंकज पवार, सोमेश्वर पोराटे यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
 
 
संचालन रोशनी नागपुरे व अंडर ऑफिसर कोमल शितळे यांनी तर आभार प्रा. वंदना तलमले यांनी मानले. यशस्वीतेसाठी सीनियर अंडर ऑफिसर कल्याणी लिखाार, रितेश बुटे, सौरभ साव व एनसीसी छात्र सैनिकांनी सहकार्य केले. कार्यक्रमास प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0