...तर वाचला असता माझ्या बायकाेचा जीव

02 Mar 2026 09:18:18
अनिल कांबळे
नागपूर,
sbl company आम्ही दाेघेही नवराे-बायकाे एसबीएल कंपनीत कामाला लागलाे. मी रात्रपाळीला तर ती दिवसपाळीला काम करीत हाेती. कंपनीच्या प्रवेशद्वारावरच सकाळी एकमेकांची भेट झाली. ‘माझी प्रकृती ठिक वाटत नाही’, असे ती म्हणाली. त्यामुळे तिला कामावर जाण्याऐवजी साेबत घरी जाण्याचा आग्रह धरला. मात्र, तिने हलाखीच्या परिस्थितीची जाणिव करुन देत कामावर जाण्याचा निर्णय घेतला. जर बायकाेे हट्ट न धरता माझ्यासाेबत घरी परत आली असती तर तिचा जीव वाचला असता, अशी भावना व्यक्त करीत पती धाय माेकलून रडत हाेता. मंजूश्री येसकर असे स्फोटात मृत पावलेल्या महिलेचे नाव आहे.
 
 

काटोल स्फोट  
 
 
निळकंठशी चर्चा केली असता, ताे म्हणाला की, मंजूश्री आणि मी एसबीएल कंपनीत नाेकरीला लागलाे. आम्हाला गाैरी (10) आणि ऋतिक (8) अशी दाेन मुले आहेत. मी रात्रपाळीला तर मंजूश्री ही सकाळी सात वाजता कामाला जाते. दाेघेही कंपनीच्या प्रवेशद्वाराजवळ आम्ही भेटताे. काही वेळ गप्पा करताे आणि मंजू ही कंपनीत जाते तर मी दुचाकीने घरी निघून जाताे. नित्यक्रम असल्यामुळे आज सकाळी मी कंपनीतून बाहेर आलाे तर मंजू वाट बघत हाेती. ‘अहाे मला आज बरं वाटत नाही,’ असे ती म्हणाली. ‘नकाे जाऊ कामावर, माझ्यासाेबत घरी चल’ असे मी तिला म्हणालाे. ‘घरची परिस्थिती नाजूक आहे. त्यामुळे मजुरी बुडवणार नाही. कारण पुतण्याच्या लग्नालासुद्धा सुट्या घ्याव्या लागतील.’ असे कारण सांगून ती कंपनीच्या प्रवेशद्वारातून झरझर निघून गेली. ती पाठमाेरी हाेईपर्यंत मी बघतच राहिलाे. मात्र, बायकाेने हट्ट धरला नसता आणि माझ्यासाेबत घराकडे आली असती तर तिचा जीव वाचला असता, अशी भावना निळकंठने व्यक्त केली.
कुटुंबियांची कायम साथ
निळकंठ आणि मंजूश्री यांनी गरीबीत संसार सुरु केला. मंजूश्रीचा भाऊ मंगेशने त्यांना नेहमी मदत केली. मंजूश्रीच्या माहेरच्या कुटुंबियांनी कायम साथ दिली.sbl company आज दुःखाचा डाेंगर काेसळल्यानंतर मंगेश हा खंबीरपणे पाठीशी उभा हाेता. बहिणीच्या जाण्याचे दुःख आणि भाचा आणि भाचीचे मातृछत्र हरविल्याच्या जाणिवेने ताेसुद्धा खिन्न चेहऱ्याने बसलेला हाेता.
Powered By Sangraha 9.0