पराग मगर
नागपूर,
sbl industrial काटाेल तालुक्यातील राऊळगाव येथील एस बी. एल. इंडस्ट्रियल एक्सप्लाेसिव्ह मॅन्युफॅक्चरर कंपनीत नेहमीप्रमाणेच कामाला गेलेल्या कामगारांची सकाळच त्यांच्यासाठी काळरात्र ठरली. सकाळची शिफफ्ट सुरू हाेताच कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात तब्बल 18 कामगारांचा मृत्यू झाला तर 24 जण जखमी झाले. विशेष म्हणजे यात सर्वाधिक महिला हाेत्या आणि हाेळीसाठी बहुतांश जणी आज सुटी मागणार हाेत्या.sbl industrial ही घटना घडताच मृत आणि जखमींच्या कुटुंबीयांनी लाेकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहकार्याने आंदाेलनाचा पवित्रा घेतला. ‘उद्या सर्वत्र हाेळी पेटणार अन् आमच्या घरी चिता’ असा उद्वेग या घटनेत हाेरपळून निघालेल्या कुटुंबीयांनी यावेळी व्यक्त केला.
या घटनेची माहिती मिळताच काँग्रेसच्या माजी. जि. प. अध्यक्ष सुनीता गावंडे आणि महाराष्ट्र राज्य बारूद फॅक्टरी मजदूर संघटनेचे अध्यक्ष स्वप्नील वानखेडे यांच्यासह मृत व जखमींच्या नातेवाईकांनी कंपनीच्या कार्यालसमाेर ठिय्या मांडला. जाेपर्यंत मृतांच्या नातेवाईकांना पूर्ण माेबदला मिळणार नाही ताेपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेतला. पालकम मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, खासदार श्याम बर्वे, आ. चरणसिंह ठाकूर, माजी मंत्री सुनील केदार, सलील देशमुख यांनी घटनास्थळाला भेट देत परिस्थितीची पाहणी केली.
देह झाले छिन्नविछिन्न
डेटाेनेटरला वायरची जाेडणी करीत असताना हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. हा स्फोट इतका भयानक हाेता की मृतांच्या शरीराचे जळालेले तुकडे अक्षरशः परिसरात फेकले गेले, तर काहींचा जागेवरच काेळसा झाला. एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या चमूने सर्व मृतदेह आणि जखमींना जवळपास 15 रुग्णवाहिकांतून रुग्णालयात पाठविले. मृतांच्या मांसाचे अक्षरशः एक-एक तुकडे जमा करावे लागले, अशी माहिती एनडीआरएफच्या एका जवानाने दिली.
कामगार असायचे कायम दहशतीत
स्वप्नील वानखेडे यांनी दिलेल्या माहितीनुसार येथील सर्वच कामगार कायम दहशतीत असायचे. काम करताना त्यांना सुरक्षेच्या कुठल्याच सुविधा दिल्या जात नव्हत्या. किमान वेतन दिले जात नव्हते. गरजेपेक्षा अधिकचे काम त्यांच्याकडून करून घेतले जात हाेते. तसेच साधी साप्ताहिक सुटीही त्यांना दिली जात नव्हती, अशी माहिती त्यांनी दिली.
पुरावे नष्ट केल्याचा आराेप
ही घटना घडताच कंपनीतील व्यवस्थापन सांभाळणारे अधिकारी पळून गेले. त्यांनी येथील मस्टर फाडून फेकले आणि सीसीटीव्ही देखील फोडले, असा आराेप सुनीता गावंडे यांनी केला. या सगळ्यांची चाैकशी हाेईल आणि दाेषींवर कारवाई हाेईल असे आश्वासन जयस्वाल यांनी दिले.
...ताेपर्यंत मृतदेह रुग्णालयातच ठेवा
कंपनीत काम करणारे बहुतेक कामगार हे आसपासच्या गावातील आहेत. यात बहुतांश महिला हाेत्या. कंपनी प्रशासनावर आम्हाला विश्वास नाही. जाेपर्यंत कंपनीकडून मृतांना 50 लाख आणि शासनाकडून 15 लाख मिळत नाही, ताेपर्यंत मृतदेह रुग्णालयातून हलवू देणार नाही, असा प्रवित्रा यावेळी आंदाेलकांनी घेतला. तसेच कंपनीचे मालक आलाेक चाैधरी आणि अभिषेक जयस्वाल यांच्यावर सदाेष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी वानखेडे यांनी केली.
कंपनीची ‘वाट’ खडतर
कंपनीमध्ये जाणारा जवळपास चार किमीचा रस्ता हा अतिशय खराब आहे. याच रस्त्याने आजवर सर्वांची ये-जा सुरू हाेती. अचानक वैद्यकीय मदत लागल्यास हा रस्ता पार करणे सर्वांसाठीच कठीण हाेते. आजही जखमींना उपचारासाठी नेताना या रस्त्यामुळे अधिकचा वेळ आणि त्रास सहन करावा लागला