आत्मघातकी खामेनेई आणि जग

02 Mar 2026 10:22:01
अग्रलेख
khamenei रमजानचा पवित्र महिना सुरू असताना मुस्लिम जगतासाठी रविवारची सकाळ दु:खद बातमी घेऊन आली. शनिवारी सकाळी अमेरिका आणि इस्रायलच्या लढाऊ विमानांनी इराणची राजधानी तेहरानवर बॉम्बवर्षाव केला. लक्ष्य होते तेहरानमधील खामेनेई यांचे निवासस्थान आणि कार्यालय. कधीकाळी इराणचे शासक मोहम्मद रझा पहेलवी यांचा राजवाडा म्हणून प्रसिद्ध इमारत ताब्यात घेऊन त्याला खामेनेई यांचे निवासस्थान आणि कार्यालयात रूपांतरित केले गेले. विशेष म्हणजे हा राजवाडा हंगेरीयन ज्यू अभियंत्याने डिझाईन केला होता. गेल्या जवळपास चार दशकांपासून खामेनेई राजवटीचे केंद्र असलेल्या या निवासस्थानावर शनिवारी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास प्रचंड शक्ती असलेले 30 बॉम्ब टाकण्यात आले. जमिनीच्या पोटात खोलवर घुसलेल्या बॉम्बचे स्फोट झाल्याने खामेनेई यांचे निवासस्थान बेचिराख झाले. हल्ल्यात इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते, सुप्रीम कमांडर आयातोल्लाह सय्यद अली हुसेनी खामेनेई यांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबातील अनेक जण या हल्ल्यात मारले गेले. खामेनेई मारले गेल्याचा दावा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी शनिवारी मध्यरात्रीच केला होता; पण इराणने तो साफ शब्दात फेटाळून लावला होता.
 

खामेनी  
 
 
आमचे सर्वोच्च नेते सुखरूप असून ते लवकरच जनतेला संबोधित करतील, असेही इराणी लष्कराने म्हटले होते. याचदरम्यान खामेनेई यांच्याबाबत उलटसुलट बातम्या पसरल्या होत्या. ते उत्तर कोरियात आश्रयास गेल्याच्या काही बातम्या होत्या. पण, शेवटी नेत्यानाहू यांनी केलेला दावा खरा ठरला. रविवारी सकाळी इराणच्या सरकारी टीव्हीने खामेनेई यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. अफगाणिस्तान-पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या संघर्षात आधीच दोन्ही बाजूंचे शेकडो सैनिक आणि नागरिक मारले गेले आहेत. मारले गेलेले सर्व मुसलमान आहेत. रमजान हे अल्लाहच्या जवळ जाण्याचे, उपवास करून जास्तीत जास्त पुण्य कमाविण्याचे आणि जन्नतचा मार्ग सुकर करण्याचे पर्व आहे. पण, दुर्दैवाने इस्लामचा उदय, प्रसार आणि उत्थानाची भूमी असलेल्या अरबस्थानावर युद्धाचे ढग पसरले आहेत. अमेरिका-इस्रायलला मदत केल्याच्या संतापातून इराणने मागचा-पुढचा विचार न करता थेट सौदी अरेबिया, कतार, बहरीन, संयुक्त अरब अमिरात, इराक, जॉर्डन, कुवैत या मुस्लिम देशांवरच क्षेपणास्त्रे आणि ड्रोन्सचा मारा केला. अर्थात हे हल्ले इराणने अमेरिकेच्या वरील देशांतील लष्करी तळांवर केले.
सौदी आणि इराण यांच्यातून विस्तवही जात नाही. एवढेच नव्हे, तर सौदीच्या राजपुत्रानेच खामेनेई यांचा ठावठिकाणा सांगितल्याचा आरोप केला जात आहे. एखादी राजवट असो, राजसत्ता असो की हुकूमशहा, जे जनतेच्या भल्यासाठी, तिच्या विकासासाठी आणि उत्थानासाठी कार्य करणार नाहीत, त्या सर्वांचा अंत असाच झाल्याचे दाखले इतिहासात आहेत. गेल्या अनेक दशकांपासून इराणमध्ये जनतेचे दमन सुरू आहे. गेले काही महिने तर तो देश अशांत आहे. तेथे बुरख्याविरोधात रस्त्यावर उतरलेल्या महिला, युवतींवर प्रचंड अत्याचार झाल्याचे जगाने पाहिले आहे; अगदी दीड महिन्यापूर्वी खामेनेई यांच्याविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांवर प्रचंड अत्याचार करण्यात आले. साडेसात हजारांहून अधिक नागरिकांना ठार मारण्यात आले. शेकडो बेपत्ता आहेत. ज्या शासकाला जनतेचे हित कळत नाही, दु:खाची जाणीव होत नाही, त्या शासकाला सत्तेवर राहण्याचा मुळीच अधिकार नसतो. कधी शरण जाऊन तर कधी पटत नसला, तरी तह करून लोकांचे जीव आणि संपत्ती सुरक्षित राखणे हे राजाचे, शासकाचे कर्तव्य असते. शत्रू प्रबळ झाल्यास अथवा त्याचा दबाव सहन करणे अशक्य असल्याची जाणीव झाल्यास दोन पावले माघार घेणे शहाणपणाचे लक्षण मानले जाते. अली खामेनेई हे ताडण्यात कमी पडले. स्वतःला सर्वशक्तिमान आणि समर्थ समजण्याची चूक त्यांनी केली. कोणत्याही अंगाने अमेरिकेचा सामना करण्याची क्षमता इराणमध्ये नाही. अमेरिका किंवा इस्रायल यात पूर्णपणे निर्दोष आहेत, असे म्हणता येत नाही. पण इराणने मध्य पूर्वेत मित्र कमावले नाहीत आणि तुलनेत बलाढ्य शत्रूशी पंगा घेतला. धर्माचे नाव घेत आपल्याकडे नसलेल्या शक्तीचे प्रदर्शन करणे आणि अमेरिकेला धडा शिकविण्याची भाषा करणे खामेनेई यांना भोवले. डोनाल्ड ट्रम्प हे गेल्या दोन महिन्यांपासून अण्वस्त्रांच्या मुद्यावर चर्चा करण्याचे आवाहन करीत होते. इराणने अण्वस्त्रे तयार करू नयेत, एवढीच अमेरिकेची मागणी होती. ही मागणी मान्य केली असती तर पुढील अनर्थ टळला असता. वास्तविक पाहता मध्यपूर्वेत इराण हा शक्तिशाली देश मानला जातो. इस्रायल आणि अमेरिका हे देश इराणपासून हजारो किलोमीटर अंतरावर आहेत. त्यामुळे भारताला जसा पाकिस्तान, चीन यांचा थेट धोका आहे, तसा इराणला नाही. शक्तिशाली सैन्य दल, शस्त्र भंडारात हजारो क्षेपणास्त्रे, ड्रोन्स असणाऱ्या इराणवर हल्ला करण्याची क्षमता जगातील कोणत्याही मुस्लिम देशात नाही. खरे तर मुस्लिम जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता या देशात आहे; पण अमेरिका, इस्रायलचा विरोध करण्याच्या हट्टापायी इराणने स्वतःला युद्धाच्या आगीत झोकून दिले. ईश्वरी शक्ती आपल्याला युद्धात विजय प्राप्त करून देईल, अशी भाबडी आशा बाळगणारे अली खामेनेई यांना अखेर जीव गमवावा लागला.khamenei देशाची इभ्रत घालविली ती वेगळीच. अली खामेनेई हे अमेरिका आणि इस्रायल यांना कायम शत्रू मानत आले. ज्यूंना जिवंत राहण्याचा अधिकारच नाही, असे खामेनेई म्हणायचे. याचा अर्थ 80 लाख इस्रायलींचे अस्तित्वच त्यांनी धोक्यात आणले. अमेरिकेलाही त्यांनी धमक्या दिल्या. मध्यपूर्वेतील अमेरिकेच्या लष्करी तळांवर तैनात असलेल्या 40 हजार सैनिकांना लक्ष्य करण्यात येईल, अशी धमकी खामेनेई यांनी दिली. अस्तित्वावरच संकट निर्माण झाल्याने इस्रायलने अमेरिकेच्या मदतीने खामेनेईंना संपविण्याच्या मोहिमेत सहभाग घेतला. लष्करी क्षमता, शस्त्रास्त्रे, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि गुप्तहेरांचे जाळे या बाबतीत इराण इस्रायलच्या आसपासही नाही. अमेरिकेसारख्या शक्तिशाली देशाला आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारख्या नफेखोर, सनकी, कुटिल आणि युद्धखोर राष्ट्राध्यक्षाला आव्हान देणे म्हणजे विषारी सापाच्या बिळात हात घालण्यासारखे आहे. ही भयंकर चूक खामेनेई यांनी केली आणि त्याचीच जबर किंमत इराणला चुकवावी लागत आहे. आज केवळ इराणच नव्हे तर जगाला युद्धाच्या झळा पोहोचत आहेत. इराणचे लष्कर अजूनही माघार घ्यायला तयार नाही. सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात, कतार, ओमान या मुस्लिम देशांवर इराण क्षेपणास्त्रांनी हल्ले करीत आहे. या संघर्षाला शिया-सुन्नी वादाची किनारही आहे. खामेनेई मारले गेल्यानंतर पाकिस्तानात शिया समुदाय रस्त्यावर उतरला आहे. कराचीतील अमेरिकन दुतावासात घुसून तोडफोड करीत आग लावल्याचा प्रकार घडला आहे. भारतातही शिया समुदाय संताप व्यक्त करीत रस्त्यावर उतरला आहे. लखनौ आणि श्रीनगरमध्ये शियांनी इस्रायल आणि अमेरिकेच्या विरोधात नारेबाजी केली. भारतात होणारी ही आंदोलने केवळ धर्माच्या आधारावर आहेत. खामेनेई शिया असल्याने शिया मुस्लिम आंदोलन करीत आहेत. पण, जेव्हा पहलगाममध्ये 26 हिंदूंना धर्माच्या आधारावर गोळ्या घालून ठार मारले गेले तेव्हा हिंदू समाज वगळता कुणीही रस्त्यावर उतरले नाही. बांगलादेशात गेले वर्षभर हिंदूंचा अनन्वित छळ सुरू आहे.
15 पेक्षा जास्त हिंदूंना मुस्लिमांनी ठार मारले; त्यांची संपत्ती लुटली, पण एकही गैरहिंदू संघटना अथवा नागरिकांनी रस्त्यावर उतरून निषेधाचा शब्दही काढला नाही. काश्मीर खोèयात जेव्हा काश्मिरी ब्राह्मणांना ठार मारले, डोळ्यादेखत बलात्कार केले, त्यांची घरेदारे लुटली, घरे, जमिनींवर कब्जा केला तेव्हा एकही शिया मुस्लिम श्रीनगरमध्ये रस्त्यावर उतरला नाही. हिंदू समुदाय ह्या घडामोडी मनात साठवून ठेवतो आहे. 86 वर्षीय शिया धार्मिक नेते खामेनेई यांच्या मृत्यूचे समर्थन केले जाऊ शकत नाही. कोणत्याही देशाच्या सर्वोच्च धार्मिक नेत्याला अशाप्रकारे जिवानिशी संपविण्याच्या इस्रायल-अमेरिकेच्या कृतीचा निषेध होईलच. कारण शांततामय जगात हिंसेला थारा नाही. पण, खामेनेई यांनी ज्या चुका केल्या, त्याचे परिणाम केवळ खामेनेई अथवा इराणलाच नव्हे तर जगाला भोगावे लागत आहेत. एकप्रकारे इराणने स्वतःसोबत उर्वरित जगालाही संकटात टाकले आहे. यातून लवकर मार्ग निघो आणि जगात शांतता नांदो, एवढीच अपेक्षा सध्या करता येते.
Powered By Sangraha 9.0