आग्रा,
5 killed in accident in Rajasthan उत्तर प्रदेशातीलमधील आग्रा परिसरात भीषण रस्ता अपघात घडून एका कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. राजस्थानमध्ये देवीचे दर्शन करून परतणाऱ्या कुटुंबाच्या वाहनाचा ताबा सुटल्याने ते थेट झाडावर जाऊन आदळले आणि या दुर्घटनेत पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना चित्राहाट भागात गुरुवारी उशिरा रात्री घडली. दोन वाहनांतून प्रवास करणारे हे कुटुंब राजस्थानमधील करौली येथे कैला देवी मंदिर येथे दर्शन घेऊन परत येत होते.

अपघाताची तीव्रता इतकी होती की वाहनाचा चेंदामेंदा झाला. मागून येणाऱ्या दुसऱ्या वाहनातील नातेवाईकांनी तात्काळ मदतकार्य सुरू केले आणि पोलिसांना कळवले. स्थानिक नागरिकही मोठ्या आवाजानंतर घटनास्थळी धावून आले. त्यांनी वाहनाची काच फोडून आत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.या दुर्घटनेत माजी लष्करी जवान कामता प्रसाद, त्यांचा मुलगा, सून, तीन वर्षांची नात आणि वाहन चालक यांचा मृत्यू झाला आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. प्राथमिक चौकशीत चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात घडल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून एका कुटुंबावर आलेल्या या दुःखद प्रसंगाने सर्वत्र शोककळा पसरली आहे.