दिल्ली दंगलीतील आरोपी शरजीलला अंतरिम जामीन

20 Mar 2026 15:11:25
नवी दिल्ली,
Accused Sharjeel granted interim bail दिल्लीतील २०२० मधील दंगलीशी संबंधित प्रकरणातील आरोपी शरजील इमाम याला जवळपास सहा वर्षांनंतर तात्पुरता दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार त्याला दहा दिवसांसाठी अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला असून, शुक्रवारी त्याची तुरुंगातून सुटका झाली. कौटुंबिक कारणांमुळे हा दिलासा देण्यात आला असून, भावाच्या लग्नाला उपस्थित राहणे आणि आजारी आईची देखभाल करणे या कारणांसाठी न्यायालयाने ही परवानगी दिली आहे. शरजीलच्या कुटुंबीयांनी या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. त्याचा भाऊ म्हणाला की, अनेक वर्षांनंतर शरजील आपल्या आईला भेटणार असून, कुटुंबासाठी हा अत्यंत भावनिक क्षण आहे. वडिलांच्या अनुपस्थितीत शरजील हा कुटुंबाचा आधार असल्याचेही त्याने नमूद केले. न्यायालयाने घालून दिलेल्या सर्व अटींचे पालन करूनच हा कालावधी पूर्ण केला जाईल, असे कुटुंबीयांनी स्पष्ट केले आहे.
 
 
Accused Sharjeel
 
शरजील इमाम याला जानेवारी २०२० मध्ये बिहारमधील जहानाबाद येथून अटक करण्यात आली होती. काही शैक्षणिक संस्थांमध्ये दिलेल्या भडकाऊ भाषणांमुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर फेब्रुवारी २०२० मध्ये दिल्लीत उसळलेल्या दंगलीत त्याची भूमिका असल्याचा आरोप ठेवत त्याच्यावर कठोर कायद्यांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तेव्हापासून तो कोठडीत होता. या प्रकरणात त्याच्यासह इतर काही जणांवरही कट रचल्याचा आरोप आहे. यापूर्वी त्याने केलेले जामीन अर्ज न्यायालयांनी फेटाळले होते. दिल्लीतील त्या दंगलीत अनेकांचा मृत्यू झाला होता, तर शेकडो जण जखमी झाले होते. नागरिकत्वाशी संबंधित कायद्यांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही हिंसक घटना घडली होती, ज्यामुळे परिस्थिती दीर्घकाळ तणावपूर्ण राहिली होती.
Powered By Sangraha 9.0