बहुरूपी, बुभुक्षित भोंदू!

20 Mar 2026 05:00:00
अग्रलेख  
 
 
captain kharat case कोणत्याही एखाद्या उत्पादनास किंवा सेवेस मोठी मागणी असल्याचे सिद्ध होऊ लागते तेव्हा मागणीनुसार पुरवठा करणाऱ्यांची गर्दीही वाढू लागते, आणि मागणी वाढू लागली की त्या उत्पादन किंवा सेवेची किंमतही वाढत जाते, हा अर्थशास्त्राचा सामान्य नियम अध्यात्माच्या बाजाराला तंतोतंत लागू ठरताना दिसत आहे. असे झाले की वस्तू वा सेवांचा दर्जा खालावतो, भेसळीसारखे प्रकार वाढतात आणि काळाबाजारासही ऊत येतो. अलिकडे असंख्य संकटे आणि समस्यांचा सार्वत्रिक सुळसुळाट झालेला असताना व त्यापासून संरक्षण करण्याची हमी देणाऱ्यांचे हात मात्र तोकडे ठरत असताना, समाज किंवा व्यक्ती संरक्षणाच्या अपेक्षेने कोठे तरी नजरा खिळवून बसलेली असते. ज्यांचे हात वरपर्यंत वगैरे पोहोचलेले असतात, खिसे कायम खुळखुळत असतात, अशांना असे संरक्षण मिळविणे फारसे अवघड होत नाही. पण असा वर्ग फारच थोडा असून ज्यांची तशी क्षमता नाही, त्यांना मात्र समस्यामुक्ती आणि संकटांपासून संरक्षणासाठी देवावर किंवा नियतीवर अवलंबून राहणे भाग पडते. कोणत्याही समस्येमुळे ईश्वराने किंवा दैवाने मार्ग काढून द्यावा अशी हतबल भावना जेव्हा सामूहिकरीत्या वाढीस लागते, तेव्हा अशा हतबलांची गर्दी श्रद्धेच्या बाजारात सुरक्षिततेचा शोध घेऊ लागते आणि या बाजारातील सेवा किंवा उत्पादकांची मागणी वाढू लागली की पुरवठादारांची चंगळ सुरू होते.
 
 

बहुरूपी, बुभुक्षित भोंदू! 
 
 
बाजाराचा हा नियम श्रद्धेच्या बाजारातही लागू ठरू लागला, तेव्हापासून अनेकांनी या बाजारात आपली आपली दुकाने थाटली. गेल्या काही दशकांपासून या बाजारात कायम तेजीच दिसत असून येथील दुकानदारांची भरभराट होत असल्याचे दिसते. कारण, या बाजारात मानसिक गरजांची पूर्तता होते अशी भावना असलेल्या ग्राहकांकडून दुकानदारांच्या दारी रीघ लागलेलीच असते. त्यामुळे दिवसागणिक कोठल्या ना कोठल्या गावात, शहरात किंवा देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात एखादा बाजारू दुकानदार आपले दुकान सुरू करतो, आपल्या पद्धतशीर यंत्रणेद्वारे लाखो रुपये खर्च करून जोरदार जाहिरातबाजी करतो आणि असे नवे दुकान सुरू झाल्याचे कळताच, तिकडे गरजू ग्राहकांची रीघ लागते. या व्यवसायाची साखळी मोठी गूढ असते. तो धंदा बघता बघता फोफावतो आणि मानसिक सुखाच्या भ्रामक कल्पनांत गुरफटलेला ग्राहकही त्या दुकानाची जाहिरात करू लागतो. अशा रीतीने अध्यात्म, ज्योतिष, भविष्यज्ञान, संकटमुक्ती, प्रमेविवाह, प्रतिष्ठा, राजकीय यश, संपत्तीच्या समस्या, कौटुंबिक कलह, अपत्यप्राप्ती अशा असंख्य समस्यांनी ग्रासलेले ग्राहक या दुकानदारांकडे रांगा लावतात. या बाजारातील प्रत्येक दुकानदाराने आपल्या धंद्याला साजेसा अवतार धारण केलेला असतो. यासाठी फार मोठी भांडवली गुंतवणूकही केलेली असते. प्रथमदर्शनी संकटमोचक भासावा असा एक मुखवटा त्यांना धारण करावा लागतो. त्यांच्या चेहऱ्यावर एक निरागस हास्य विलसत असते. अंगी ईश्वरी किंवा अतिमानवी शक्ती असल्याची जाणीव करून देणारा बाह्यांगी साधेपणा त्यांना धारण करावा लागतो आणि वैराग्याची किंवा विरक्तीची चिन्हे असलेली वेषभूषा परिधान करून आध्यात्मिक तेजाची झळाळी असलेल्या मुखवट्याआड मूळचा चेहरा बेमालूम झाकून ठेवावा लागतो. दैवी शक्तीचा वास असल्याचा भास व्हावा यासाठी मठ किंवा आश्रम नावाच्या या दुकानात धूप, अगरबत्त्या, चंदनादी पूजावस्तूंची गर्दी ठेवावी लागते आणि भक्तगण जमा होऊ लागले की दिशाभूल करण्यासाठी एखाद्या चमत्काराची जादूही त्यांनी आत्मसात करून ठेवावी लागते. एवढा जामानिमा सज्ज झाला, म्हणजे, श्रद्धेच्या बाजारातील हे दुकान धंदा करण्यास व ग्राहकांना जाळ्यात ओढण्यास सुरुवात करते व समस्याग्रस्त, पीडित गरजवंतांची त्यांच्या दारी रीघ लागते.
आजकाल खात्रीशीर माल मिळण्याची कोणतीच हमी कोणत्याही बाजारात मिळत नसल्याने, सहसा फसवणूकच पदरी पडत असल्याने या श्रद्धेच्या बाजारातही फसवणुकीचेच प्रकार होत असतात, हे माहीत असूनही, गरजवंत ग्राहक या बाजारात योग्य दुकानदार शोधत वणवण फिरत असतो आणि एखाद्या धंदेवाईकाच्या नादी लागून पुरता नागविला गेला तरी त्याचे खापरही दैवावर किंवा नशिबावर फोडून नव्या संकटातून बाहेर पडण्याकरिता फसविणाऱ्या भोंदूचेच पाय धरतो, हे सार्वत्रिक स्पष्ट असल्याने, यापैकी कोणा भोंदूचा धंदा सहसा बंद पडत नाही. यापैकी अनेक भोंदूंना थेट राजाश्रय आणि राजकीय संरक्षणही मिळाले असल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांच्या दुकानांस टाळे लावण्याचे धाडस दाखविणेदेखील अवघड झाल्याची अनेक उदाहरणे या बाजारात पाहावयास मिळालेली आहेत.
 
असेच एक दुकान महाराष्ट्राच्या अहिल्यानगर आणि नाशिक परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून जोमाने धंदा करत होते. त्याच्या नादी लागलेल्या ग्राहकांमध्ये सर्वच प्रकारचे भक्त असल्याने, त्याच्या धंद्याला संरक्षणाचे कवचही लाभल्याची चर्चा होती. राजकीय नेते, मंत्री, प्रतिष्ठित उद्योजक, सामान्य समस्याग्रस्त अशा सर्वांना या भक्ताने समस्यामुक्तीचा भविष्यवेधी मार्ग दाखविणारे दुकान सुरू केले आणि फसवणुकीच्या एका प्रकरणात त्याचा मुखवटा टराटरा फाटला. भविष्यवेध घेऊन समस्यामुक्तीचा मार्ग दाखविण्याचा दावा करणारा कॅप्टन खरात नावाचा हा भोंदू म्हणजे केवळ एका व्यक्तीच्या विकृत गुन्हेगारी प्रवृत्तीचे उदाहरण नाही; तर ते आपल्या समाजाच्या मानसिकतेतील खोलवर दडलेल्या अंधश्रद्धा, भीती आणि आंधळ्या श्रद्धेच्या जाळ्याचे भयावह चित्र उलगडणारे आणखी एक उदाहरण आहे. स्वतःला आध्यात्मिक मार्गदर्शक, ज्योतिषी आणि ‘दैवी शक्तीचा धनी’ म्हणविणायाऱ्या  या भोंदू दुकानदाराने असाच, आध्यात्मिक मुखवटा चढविला आणि कोणत्या ना कोणत्या समस्यांच्या भयाने पछाडलेल्या महिलांना मुक्तीचा विश्वास देत त्यांच्या शारीरिक आणि मानसिक शोषणाची आपली विकृती जोपासत राहिला. कॅप्टन खरात प्रकरण ही बाब जितकी धक्कादायक आहे, तितकीच सामाजिक मानसिकतेच्या बदलांचा अंतर्मुखपणे विचार करावयास भाग पाडणारी आहे. उपाय, विधी, कुंडली दोष किंवा दैवी संकट यांसारख्या संकल्पनांच्या आडून लोकांना भयभीत करणे आणि त्यातून स्वतःसाठी सत्ता व नियंत्रण निर्माण करणे ही या भोंदूची या बाजारातील युक्ती नवीन नाही. मात्र, या प्रकरणात ती अत्यंत योजनाबद्ध आणि क्रूर स्वरूपात वापरली गेल्याचे दिसते. गुंगीची औषधे देऊन अत्याचार करणे आणि त्याचे चित्रीकरण करून त्यांची पिळवणूक वा शोषण करणे ही केवळ वैयक्तिक गुन्हेगारी नाही; तर ती संघटित शोषण व्यवस्थेची लक्षणे आहेत. यामागील सामाजिक पृष्ठभूमीही दुर्लक्षित करता येणार नाही. आधुनिक शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीनंतरही समाजातील मोठा वर्ग अजूनही अंधश्रद्धेच्या पाशात अडकलेला आहे.captain kharat case संकटाच्या क्षणी तर्कबुद्धीपेक्षा ‘आशीर्वाद देऊन संरक्षणाची हमी देणारा कोणीतरी वरचा हात’ शोधण्याची मानसिकता अजूनही प्रबळ आहे. अशा वेळी ‘कॅप्टन खरात’सारखे भोंदू स्वतःला देवदूत किंवा मार्गदर्शक म्हणून उभे करतात आणि लोकांच्या भीतीचा फायदा घेतात. या प्रकरणात राजकीय आणि प्रभावशाली व्यक्तींशी असलेले संभाव्य संबंध ही बाब अधिक गंभीर म्हणावी लागेल. अशा विकृत प्रवृत्तींना किंवा व्यक्तींना सामाजिक किंवा राजकीय संरक्षण मिळत असेल, तर न्यायव्यवस्थेवरचा विश्वास डळमळीत होणे अपरिहार्य आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी केवळ गुन्हेगाराला शिक्षा देण्यापुरती मर्यादित राहू नये; तर त्या मागील साखळी, संबंध आणि संभाव्य संगनमत उघड करणेही तितकेच आवश्यक आहे. महिला सुरक्षेच्या दृष्टीनेही हे प्रकरण म्हणजे धोक्याचा एक गंभीर इशारा आहे. घर, कार्यालय किंवा सार्वजनिक ठिकाणांबरोबरच ‘आध्यात्मिक’ किंवा ‘धार्मिक’ जागाही सुरक्षित आहेत, असा समज या घटनेने खोटा ठरवला आहे. महिलांच्या विश्वासाचा गैरवापर करून केलेले शोषण हे समाजाच्या नैतिक अध:पतनाचे द्योतक आहे. त्यामुळे महिलांनी अशा तथाकथित गुरू, बाबांबाबत अधिक सजग राहणे आणि कोणत्याही संशयास्पद वर्तनाची त्वरित तक्रार करणे आवश्यक आहे.
 
गेल्या अनेक दशकांत वारंवार उघडकीस येत असलेल्या अशा घटनांतून समाज जागृतीचे आणि श्रद्धा व अंधश्रद्धा यांतील धूसर सीमरेषा दाखवून देण्याचे महत्त्वही पुन्हा अधोरेखित होते. महाराष्ट्राने यापूर्वीही कायदे किंवा मोहिमांतून समाजजागृती केली आहे; परंतु अजूनही ती अपुरी आहे. शिक्षण व्यवस्थेत वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे, माध्यमांनी जबाबदारीने अशा प्रकरणांचा पाठपुरावा करणे आणि प्रशासनाने कठोर कारवाई करणे, या तिन्ही गोष्टी एकत्रितपणे घडल्याशिवाय बदल संभवत नाही. कॅप्टन खरात प्रकरणातून पुन्हा तोच जुना मूलभूत प्रश्न पुढे आला आहे. आपण खरोखरच पुरोगामी, प्रगतिशील, आधुनिक, विवेकनिष्ठ समाज आहोत, की संकटाच्या वेळी अजूनही आपण अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन अंधश्रद्धांच्या बाजारपेठांतील भोंदू बहुरुप्यांची भरभराट करतो, या प्रश्नाचे उत्तर शोधणे ही केवळ सरकार किंवा न्यायव्यवस्थेची जबाबदारी नाही. विवेक, विज्ञाननिष्ठा आणि सामाजिक जबाबदारी या मूल्यांचा स्वीकार केल्याशिवाय अशा घटनांची पुनरावृत्ती थांबणार नाही हे स्पष्ट असल्याने, ही समाजाची जबाबदारी ठरते. अन्यथा ‘कॅप्टन खरात’ ही केवळ एक व्यक्ती न राहता एक प्रवृत्ती बनत जाईल आणि तीच सर्वांत मोठी धोक्याची घंटा ठरेल.
Powered By Sangraha 9.0