वाळू माफियांचा आपसी संघर्ष शिगेला

20 Mar 2026 10:25:01
दर्यापूर, 
valu mafias जिल्ह्यातील वाळू तस्करीने आता सर्व मर्यादा ओलांडल्या असून, वाळू माफियांमध्ये सुरू झालेल्या आपसी संघर्षातून थेट महसूल प्रशासनाचीच लक्तरे वेशीवर टांगण्यात येत आहेत. अमरावती ते दर्यापूर, भातकुली मार्गावर अज्ञात व्यक्तींनी चक्क डांबरी रस्त्यावर पांढर्‍या रंगाने मोठे अक्षरे खरडून, वाळू तस्करीमध्ये एसडीओ आणि तहसीलदार हेच खरे कंत्राटदार असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. या प्रकारामुळे संपूर्ण जिल्ह्यात आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
 
 
valu mafias
 
 
नेहमीप्रमाणे वर्दळ असलेल्या या मार्गावर सकाळी प्रवाशांना रस्त्यावर लिहिलेला एक धक्कादायक मजकूर दिसला. यामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, वाळू माफिया एसडीओ व तहसीलदार ठेकेदार आहे. इतकेच नव्हे तर, टाकळी, इचोरा आणि भुजवाडा या भागात सध्या मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उत्खनन सुरू असल्याचेही यात जाहीरपणे सांगण्यात आले आहे. महसूल विभागाच्या सर्वोच्च पदस्थ अधिकार्‍यांवरच थेट भ्रष्टाचाराचे आणि माफियांसोबत हातमिळवणी केल्याचे आरोप झाल्याने खळबळ उडाली आहे. टाकळी, इचोरा आणि भुजवाडा परिसरातून दररोज शेकडो ब्रास वाळूची अवैध वाहतूक होत असतानाही स्थानिक प्रशासन आणि पोलिस विभाग गप्प का? असा संतप्त सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.valu mafias वारंवार तक्रारी करूनही कारवाई होत नसल्यानेच, त्रस्त झालेल्या नागरिकांनी किंवा वाळू माफियांच्या अंतर्गत वादातून हा प्रकार समोर आल्याची चर्चा आता दबक्या आवाजात सुरू आहे.
भररस्त्यात अशा प्रकारे अधिकार्‍यांची नावे लिहून जाहीर निषेध व्यक्त केल्याने महसूल विभागाची मोठी नाचक्की झाली आहे. या गंभीर आरोपांनंतर आता जिल्हाधिकारी काय पावले उचलतात, संबधित भागातील अवैध उत्खनन थांबणार का, आणि ज्या अधिकार्‍यांवर हे आरोप झाले आहेत, त्यांची चौकशी होणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या प्रकारामुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली असून, हे अक्षरे पुसण्याचे काम अद्यापही झाले नसल्याचे दिसून येत आहे.
Powered By Sangraha 9.0