तिरुवनंतपुरम,
Congress gives opportunity to new faces in Kerala भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने केरळमधीलआगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी आणि अंतिम यादी जाहीर करत मोठा राजकीय संदेश दिला आहे. पक्षाने स्पष्ट भूमिका घेत यंदाच्या निवडणुकीत एकाही विद्यमान लोकसभा सदस्याला उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे पक्षांतर्गत असंतोषाला नव्या वळण मिळाले आहे.१४० सदस्यीय केरळ विधानसभेसाठी काँग्रेस एकूण ९२ जागांवर निवडणूक लढवणार आहे. उर्वरित काही मतदारसंघांमध्ये पक्षाने डाव्या आघाडीविरोधात बंड केलेल्या नेत्यांना पाठिंबा देण्याची रणनीती आखली आहे. यापूर्वी जाहीर केलेल्या पहिल्या यादीनंतर आता आणखी ३७ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.

उमेदवारीबाबत अनेक खासदारांनी प्रयत्न केले होते, मात्र पक्षाने त्यांना संधी नाकारली. कन्नूरमधून उमेदवारीची अपेक्षा असलेल्या के. सुधाकरन यांना डावलून टी. ओ. मोहनन यांना संधी देण्यात आली. तसेच कोन्नी मतदारसंघातून उमेदवारीची मागणी करणाऱ्या अदूर प्रकाश यांनाही निराश व्हावे लागले असून त्या ठिकाणी प्राध्यापक सतीश कोचरंबिल यांना उमेदवारी देण्यात आली आहे.काही मतदारसंघांमध्ये पक्षाने अद्याप उमेदवार जाहीर केलेले नाहीत. अंबालापुझा, तालिपरंबा, पय्यानूर आणि ओट्टापलम या भागांत डाव्या पक्षांविरोधात बंड करून उभे राहिलेल्या नेत्यांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने थांबून पाहण्याची भूमिका घेतली आहे. बहुतेक विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली असली तरी काही ठिकाणी बदलही करण्यात आले आहेत. पेरुम्बावूरमध्ये विद्यमान आमदार एल्डोस कुनप्पिली यांना कामगिरीच्या कारणावरून उमेदवारी नाकारण्यात आली असून त्यांच्या जागी मनोज मुथेदन यांना संधी देण्यात आली आहे. त्रिपुनित्रा मतदारसंघात के. बाबू यांच्या ऐवजी दीपक जया यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कुट्टनाडमध्ये बंडखोरीचा इशारा देणाऱ्या साजी जोसेफ यांना पुंजार येथून तिकीट देत पक्षाने समन्वय साधण्याचा प्रयत्न केला आहे.
युवक नेतृत्वालाही या यादीत स्थान देण्यात आले आहे. अरनमुला मतदारसंघातून अबिन वर्गीस यांना उमेदवारी देण्यात आली असून ते कुम्मनम राजशेखरन यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत. तसेच नेमोम येथे राजीव चंद्रशेखर यांच्या विरोधात तरुण उमेदवार उभा करण्यात आला आहे. अरुविक्कारामधून माजी आमदार के. एस. सबरीनाथन यांनाही पुन्हा संधी देण्यात आली आहे. दरम्यान, पक्षात नुकतेच प्रवेश केलेल्या भाजपचे माजी नेते संदीप वॉरियर यांनाही कासारगोड जिल्ह्यातील त्रिकारीपूरमधून उमेदवारी देत काँग्रेसने नवीन चेहऱ्यांवरही विश्वास दाखवला आहे. या निर्णयामुळे केरळमधील राजकारणात आगामी काळात अधिक चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे.