सावंगा विठोबा येथे भक्तांची मांदियाळी,अवधूत महाराजांचे घेतले दर्शन

20 Mar 2026 10:49:38
चांदूर रेल्वे,
avadhoot maharaj अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातल्या सुप्रसिद्ध श्रीक्षेत्र सावंगा विठोबा येथे गुढीपाडव्याच्या दिवशी भक्तीचा महासागर उसळला. श्रीकृष्णाजी अवधूत महाराजांच्या समाधीच्या दर्शनासाठी राज्यभरातून लाखो भाविकांनी गर्दी केली. संपूर्ण नगरी भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघाली होती. सायंकाळी ६ वाजता संस्थानचे विश्वस्त व भाविकांच्या उपस्थितीत अखंड अवधूती भजनाच्या गजरात हभप चरणदास कांडलकर यांच्या हस्ते झेंड्यांना नवीन खोळ चढविण्याचा भव्यदिव्य आणि नेत्रदीपक सोहळा पार पडला. या अद्वितीय क्षणांचे साक्षीदार बनण्यासाठी उपस्थित भाविकांनी तो अनुभव आपल्या मनात कायमचा साठवून ठेवला.
 
 
avadhoot maharaj
 
 
गुढीपाडवा ते रामनवमी यात्रा महोत्सवाची सुरुवात बुधवारी मोठ्या उत्साहात झाली. पहाटेपासूनच भाविक विविध वाहनांनी सावंगा विठोब्याकडे दाखल होत होते. त्यामुळे परिसरातील रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अनेक भाविकांनी आधीच येथे मुक्काम ठोकला होता. संपूर्ण परिसरात अवधूती भजनांचे सूर गुंजत होते. भाविकांनी जागोजागी थांबून विटेवर कापूर जाळत श्री अवधूत महाराजांची भक्तिभावाने आराधना केली. त्यामुळे वातावरणात कापुराचा दरवळ पसरला होता. समाधीच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या, तरीही भाविकांनी शिस्तीत तासनतास प्रतीक्षा करून दर्शन घेतले.
 
झेंडे चढविण्याचा धार्मिक सोहळा
गुढीपाडव्याला सायंकाळी ७२ फुट उंच देव व भक्तांच्या दोन झेंड्यांना नवीन खोळ चढविण्याच्या विधीवत धार्मिक सोहळयाला सुरूवात झाली. हभप चरणदास कांडलकर यांनी श्री अवधूत महाराजांच्या समाधी व गादीचे दर्शन घेतले. संस्थानचे अध्यक्ष पुंजाराम नेमाडे यांना चरणस्पर्श केले.avadhoot maharaj यावेळी संस्थानचे उपाध्यक्ष कृपासागर राऊत, सचिव अशोक सोनवाल, विश्वस्त विनायक पाटील,गोविंद राठोड,फुलसिंग राठोड, प्रवीण कुकडकर,लक्ष्मण राठोड,वैभव मानकर,स्वप्निल चौधरी उपस्थित होते. हभप कांडलकर यांनी झेंड्यांना पायाचा स्पर्श न करता दोरखंड्याच्या साह्याने गाठा मारत जुनी खोळ काढत झेंड्याच्या टोकावर पोहोचले. यावेळी पारंपारिक झांज व मृदंगाच्या सोबत अखंड अवधूती भजनाची मांड सुरू होती. दोन्ही झेंड्यांना नवीन खोळ टाकत हभप कांडलकर हळुहळू खाली उतरले. हा भव्यदिव्य,नेत्रदीपक व चित्तथरारक धार्मिक सोहळा दोन तास चालला.
 
दोन्ही खासदारांनी घेतले समाधीचे दर्शन
अमरावती जिल्ह्याचे खासदार बळवंत वानखडे व वर्धा लोकसभेचे खासदार अमर काळे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी दूपारी सावंगा विठोबा येथील श्री कृष्णाजी महाराज यांच्या देवस्थानला भेट देवून अवधूत महाराजाच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यांचा संस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आला.
Powered By Sangraha 9.0