नागपूरच्या कन्येची आंतरराष्ट्रीय स्तरावर चमक

20 Mar 2026 16:41:43
विधी शर्मा
नागपूर, 
parnavi dhabekar नागपूरच्या गजबजलेल्या रस्त्यांवरून, वाढत्या शहराच्या बदलत्या रूपाकडे कुतूहलाने पाहणारी एक मुलगी आज जागतिक स्तरावर शहरी विकासाच्या क्षेत्रात आपली छाप उमटवत आहे. शहरातील वाहतूक कोंडी, सार्वजनिक जागांची कमतरता आणि सुरक्षित पायाभूत सुविधांची गरज यांसारख्या प्रश्नांकडे बालपणापासूनच बारकाईने पाहणाऱ्या पर्णवी धाबेकर यांनी त्या अनुभवांनाच संशोधनाचा आधार बनवला. आज त्याच संशोधनामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेचा ‘ग्लोबल अर्बन थीसिस अवॉर्ड’ मिळाला आहे.

नागपूरच्या कन्येची आंतरराष्ट्रीय स्तरावर चमक 
 
 
पर्णवी धाबेकर सध्या कॅनडामध्ये शहरी रचना व नियोजन क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या थीसिसमध्ये शहरातील रस्ते, सार्वजनिक जागा आणि वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित, सर्वसमावेशक आणि शाश्वत कशी बनवता येईल यावर संशोधन करण्यात आले आहे. शहरांची वाढ लक्षात घेऊन मल्टी-मोडल वाहतूक, पादचारी अनुकूल रस्ते, हवामान व स्थानिक संस्कृतीला अनुरूप सार्वजनिक जागा आणि भविष्यातील शहरी विकासाला पूरक अशा पायाभूत सुविधांचा आराखडा त्यांनी मांडला आहे.
या आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी जगभरातून आलेल्या संशोधन प्रकल्पांची तज्ज्ञांच्या समितीकडून अनेक टप्प्यांत तपासणी करण्यात आली.parnavi dhabekar संशोधनातील नाविन्य, व्यावहारिकता आणि शहरांच्या विकासात होणारा परिणाम या निकषांवर प्रकल्पांची निवड करण्यात आली.
नागपूरसारख्या मध्यम आकाराच्या शहरांसाठी त्यांच्या संशोधनातील कल्पना विशेष उपयुक्त ठरू शकतात. पादचारी अनुकूल रस्ते, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे एकत्रीकरण आणि पर्यावरणपूरक सार्वजनिक जागा यामुळे शहरांची राहणीमानाची गुणवत्ता सुधारू शकते, असे त्या सांगतात.
बालपणापासून नागपूरमधील विविध शहरी जागा आणि त्यातील बदल पाहताना शहर नियोजनाबद्दलची आवड निर्माण झाली. त्या आवडीला कुटुंबियांचा पाठिंबा लाभल्यामुळेच हे यश शक्य झाले, असे त्या नमूद करतात. भविष्यात भारत आणि कॅनडा या दोन्ही ठिकाणी शाश्वत आणि समावेशक शहर विकासाच्या प्रकल्पांवर काम करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.

“हा पुरस्कार माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. भारतीय शहरांमधील वास्तव समस्यांवर आधारित संशोधनालाही जागतिक स्तरावर मान्यता मिळू शकते, याचा आनंद आहे. नागपूरसारख्या शहरांसाठी उपयुक्त ठरतील अशा शाश्वत आणि सर्वसमावेशक शहरी उपायांवर पुढेही काम करत राहण्याची प्रेरणा या पुरस्कारामुळे मिळाली.”
— पर्णवी धाबेकर
Powered By Sangraha 9.0