मोदी मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील नवे चेहरे; प्रफुल्ल पटेल यांना संधी, तर ‘ज्युनियर शिंदे’...

20 Mar 2026 12:02:25
मुंबई, 
praful-patel-in-modi-cabinet महाराष्ट्रातील राजकीय वातावरण सध्या पुन्हा एकदा तापले असून विविध पातळ्यांवर महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. राज्यसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रात मंत्रिमंडळ फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. देशातील दहा राज्यांमधील ३७ जागांसाठी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकांमुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. याचा परिणाम केंद्रातील सत्तासंतुलनावर होण्याची चर्चा सुरू झाली आहे.
 
praful-patel-in-modi-cabinet
 
माहितीनुसार, महाराष्ट्रातील दोन नेत्यांना मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रफुल्ल पटेल तसेच शिंदे गटातील खासदार श्रीकांत शिंदे किंवा श्रीरंग बारणे यांपैकी एकाची निवड होऊ शकते. अलीकडेच एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. praful-patel-in-modi-cabinet या भेटीनंतर या चर्चांना अधिक बळ मिळाले असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिंदे गट आपले राजकीय स्थान मजबूत करण्यासाठी उद्धव ठाकरे गटातील खासदारांना आपल्या बाजूने वळवण्याच्या प्रयत्नात असल्याचीही चर्चा आहे. या प्रक्रियेला काही जण ‘ऑपरेशन टायगर’ असे संबोधत आहेत.
सध्या शिंदे गटाचे नेते प्रतापराव जाधव केंद्रात आयुष खात्याचे स्वतंत्र राज्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत. त्यांना पदोन्नती देऊन कॅबिनेट मंत्रीपद देण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. मंत्रिमंडळ फेरबदलात काही विद्यमान मंत्र्यांना वगळले जाऊ शकते, तर काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. praful-patel-in-modi-cabinet मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गटांच्या एकत्रीकरणाबाबतही महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. या एकत्रीकरणाला रोखण्यात प्रफुल्ल पटेल यांची भूमिका महत्त्वाची ठरल्याचे बोलले जात आहे. तसेच सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रिपद मिळवून देण्यासाठीही त्यांनी महत्त्वाचे योगदान दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्यांच्या या कामगिरीची दखल घेत त्यांना मंत्रिपद दिले जाऊ शकते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
बारामती विधानसभा मतदारसंघातही राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. या जागेवर पोटनिवडणूक होणार असून ती बिनविरोध व्हावी, यासाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, ओबीसी समाजाचे नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी ही निवडणूक बिनविरोध होऊ देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या पोटनिवडणुकीभोवती राजकीय संघर्ष निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Powered By Sangraha 9.0